कराड : बेकायदा पिस्तूल घेवून फिरणार्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केले. सैदापूर, ता. कराड येथे कृष्णा कॅनॉल परिसरात पोलीस उपअधिक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली. संशयित आरोपींकडून देशी बनावटीच्या पिस्तुलसह जीवंत राऊंड हस्तगत करण्यात आले आहेत.
अल्तमेश ऊर्फ मोन्या हारुण तांबोळी (वय 25, रा. पालकरवाडा, मंगळवार पेठ, कराड) व ओमकार दिपक जाधव (वय 22, रा. होली फॅमीली हायस्कुलजवळ, विद्यानगर, सैदापुर, ता. कराड) अशी याप्रकरणी करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैदापूर येथील कृष्णा कॅनॉल परिसरात संशयीत अल्तमेश ऊर्फ मोन्या तांबोळी व ओमकार जाधव हे दोघेजण पिस्तुल घेवून फिरत असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक राजश्री पाटील यांना मिळाली होती. या माहितीनुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस अंमलदार प्रविण पवार, सागर बर्गे, प्रशांत चव्हाण व मयुर देशमुख यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पोलीस पथकाने कृष्णा कॅनॉल परिसरात सापळा रचला. त्यावेळी अल्तमेश ऊर्फ मोन्या तांबोळी व ओमकार जाधव हे दोघेजण त्याठिकाणी आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल तसेच जीवंत राऊंड आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करून संशयीतांना अटक केले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.