सातारा : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मुलांनी सादर केलेल्या नृत्याने चित्ररथ स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळवून दिला. या दैदीप्यमान यशामुळे महाराष्ट्राच्या लोककलेचा गौरव देशपातळीवर अधोरेखित झाला आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा ठसा उमटवणारे तसेच सातारा सदरबझारची ओळख थेट देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचवणारे हे नृत्य सादरीकरण कुशल नेतृत्वकर्ता व नृत्यदिग्दर्शक राजेंद्र सपकाळ यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून साकारले. शिस्तबद्ध दिग्दर्शन, कलात्मक मांडणी आणि प्रभावी नेतृत्वामुळे हे सादरीकरण केवळ नृत्य न राहता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रभावी दर्शन ठरले. या नृत्याला राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी, विशेषतः सातारा जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, दमयंतीराजे भोसले तसेच सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी राजेंद्र सपकाळ व संपूर्ण टीमचे जाहीरपणे अभिनंदन केले. त्यामुळे हे यश सातारावासीयांसाठी अधिकच गौरवास्पद ठरले आहे. हे यश साताऱ्याच्या सांस्कृतिक गौरवात मोलाची भर घालणारे असून भविष्यातील अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.