सातारा : खरेदीदार विक्रेता संमेलन म्हणजे महिला नवोद्योजकांसाठी पर्वणीची संधी असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रियाताई शिंदे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अंतर्गत विभागीय प्रदर्शन कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. प्रदर्शनाचे नेटके नियोजन, स्टाँलची आकर्षक मांडणी याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. प्रियाताई शिंदे पुढे म्हणाल्या, की महिला व नव उद्योजकांनी आपल्या मालाची गुणवत्ता चांगली ठेवावी . ग्राहकांच्या मध्ये सेंद्रिय तसेच रसायनिक मुक्त कृषि प्रक्रिया युक्त मालाला चांगली मागणी आहे. त्यामध्ये खाद्यतेल मिलेट्स यांची मागणी आरोग्य बाबतीत जागृत असलेल्या ग्राहकांच्यात जास्त आहे. त्याचा फायदा लहु उद्योजकांनी खरेदीदार यांच्या माध्यमातून किंवा थेट ग्राहकांना संपर्क करून घ्यावा. त्याच्यातून त्यांची आर्थिक उन्नती होऊ शकते, त्यासाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासन ,मुख्यमंत्री प्रधानमंत्री ,यांची साथ शेतकऱ्यांना नक्कीच असणार आहे.
या संमेलनामध्ये कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक यांनी कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेबाबत असणाऱ्या योजना उपस्थितना विशद केल्या.
या संमेलनामध्ये सुनील महांगडे यांनी आखाती देशातील निर्यात तिच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले त्याचबरोबर प्राध्यापक पांडुरंग धुरे सागर जाधव ,दिलीप घोरपडे आणि संतोष बोबडे यांनी आरोग्यम् धनसंपदा याविषयी मार्गदर्शन करून आपला उत्पादित माल सोशल मीडियाच्या माध्यमातून कसा विकावा याविषयी मार्गदर्शन केले.
महिला दिनाच्या निमित्त महिला उद्योजकांचा त्याचबरोबर उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला अधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रास्ताविक कृषी उपसंचालक सिद्धेश्वर मोकळे यांनी केले. सर्व खरेदीदारांची ओळख प्रशिक्षक लीनेश निकम यांनी केली.सूत्रसंचालन कृषी अधिकारी अंकुश सोनावले यांनी केले तर आभार कृषी अधिकारी प्रकाश राठोड यांनी व्यक्त केले. दरम्यान या प्रदर्शनात रविवारी सातारा शहर तसेच परिसरातील हजारो नागरिकांनी तृणधान्य महोत्सवाच्या या प्रदर्शनाला भेट देऊन मनस्वी आनंद लुटला तसेच परिवारासकट या तृणधान्यांची माहिती करून घेत रविवारची तसेच रंगपंचमीची सुट्टी खऱ्या अर्थाने एन्जॉय केली दरम्यान उद्या सोमवारी या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून या प्रदर्शनाला अवश्य भेट देऊन आनंद लुटावा असे आवाहन या प्रदर्शनाचे संयोजक व स्मार्ट एक्सपोचे प्रमुख संचालक सोमनाथ शेटे यांनी केले आहे.