सातारा: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, याच काळात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार अतुल भोसले यांची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. आज दि. ३ रोजी यासंदर्भात ते माध्यमांशी बोलत होते. निवडणुकीच्या काळात महायुतीच्याच मित्रपक्षांच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आता सत्तेच्या गणितासाठी अचानक 'महायुती'ची आठवण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्हा परिषदेच्या ६५ जागांपैकी भाजपला २८ (अपक्षासह), राष्ट्रवादीला २० आणि शिवसेनेला १५ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. आता सत्तास्थापनेसाठी आकडा जुळवताना भाजपला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या साथीची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना अतुल भोसले यांनी "आम्ही राज्यात एकत्र आहोत, त्यामुळे जिल्ह्यातही महायुती म्हणूनच काम करण्याची इच्छा आहे," असे विधान केले आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्षांनी आपल्याच अनेक उमेदवारांना प्रत्यक्ष निवडणुकीत वाऱ्यावर सोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता निकालानंतर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांना महायुतीचे प्रेम उफाळून आल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.
दुसरीकडे, साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर बोलताना भोसले यांनी चेंडू वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात टोलवला असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात केली जाईल, असे सांगून वेळ मारून नेली आहे.
आता सातारा जिल्हा परिषदेवर सत्ता आणि जिल्हा परिषद अध्यक्षाच्या खुर्चीवर कोणाची वर्णी लागणार आणि भाजपचे हे 'महायुती प्रेम' यशस्वी ठरणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.