मुंबई : लग्नाचा सीझन असून अनेक लोक लग्नबंधनात अडकत आहेत. अनेक कलाकारही लग्नाच्या तयारीला लागले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदेची लग्नघाई पहायला मिळत आहे. रेश्मा शिंदेच्या लग्नाच्या समारंभांना सुरुवात झाली मात्र तिचा होणारा नवरा कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. अखेर रेश्मा शिंदेच्या होणाऱ्या नवऱ्याची पहिली झलक समोर आली आहे. हळदी समारंभातील व्हिडिओ व्हायरल होतोय.
रेश्मा शिंदेला आता हळद लागली आहे. तिच्या हळदी समारंभाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अशातच या समारंभात तिच्या होणाऱ्या नवऱ्याची छोटीशी झलक पहायला मिळाली. हे पाहून चाहतेही खूश झालेत. मात्र मुलगा नेमका कोण आहे? याचा खुलासा झाला नाही.
घरच्या घरी मेहंदी सोहळा झाल्यानंतर आता रेश्माची हळद पार पडली आहे. हळदीसाठी रेश्माने साऊथ इंडियन लूक केलेला पहायला मिळाला. हळदीच्या रंगाचा लेहंगा आणि त्यावर हिरव्या रंगाची ओढणी रेश्माने घेतलेली दिसली. तिच्या होणाऱ्या नवऱ्यानेही तिला ट्विनिंग करत पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला पहायला मिळाला.
दरम्यान, ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे उद्या 29 नोव्हेंबरला लग्न करणार असल्याचं समोर आलंय. आता चाहते तिच्या लग्नासाठी आणि होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत. रेश्मा शिंदे ही मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांचं प्रेम मिळवलं आहे.