सातारा : सातारा जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडत असताना सातारा व कोरेगाव येथे शेवटच्या एका तासांमध्ये दोन विविध घटनांमध्ये मारामारीच्या घटना घडल्या आहेत. सातार्यात किरकोळ कारणावरून राजे समर्थकांमध्ये मारामारी झाल्याने माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्यासह चौघेजण जखमी झाले. कोरेगाव मतदार संघात भोसे येथे बीप का वाजत नाही, अशी विचारणा करण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये मारामारी झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सातारा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने सातारा पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मात्र अखेरच्या टप्प्यात दोन घटनांनी शांतता प्रक्रियेला गालबोट लागले. सातार्यात येथील बापूसाहेब चिपळूणकर मतदान केंद्रावर मतदान संपल्यानंतर किरकोळ कारणावरून खासदार उदयनराजे भोसले समर्थक वसंत लेवे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थक संजय लेवे यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची होऊन दांडक्याने हाणामारी झाली. यामध्ये वसंत लेवे यांच्या डोक्यात रॉड मारण्यात आल्याची चर्चा असून या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे सातार्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कोरेगाव मतदार संघामध्ये भोसे येथील मतदान केंद्रावर सायंकाळी साडेपाच वाजता मशीन बीप का करत नाही, अशी विचारणा काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकार्यांना केली. त्यावेळी अधिकार्यांनी आमचे आम्ही बघू, अशी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यावरून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि काही अधिकार्यांमध्ये जोरदार मारामारी झाल्याची चर्चा आहे. या मारामारी चा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने हे वृत्त वेगाने पसरले. कोरेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन संबंधितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सातार्यातील मारामारीच्या घटनेचा दुजोरा शाहूपुरी पोलिसांनी दिला नाही. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
