कराड ‘कृष्णा मेडिकल’च्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीवर आंतरराष्ट्रीय मानांकनाची मोहोर

देहदानावरील लघुपटाला ‘ऑस्कर’चे कोंदण

by Team Satara Today | published on : 13 October 2025


कराड :  कृष्णा विश्व विद्यापीठातील मेडिकल कॉलेजच्या टायसन फर्नांडिस याने ॲनाटॉमी विभागाचे प्रमुख डॉ. एम. पी. अंबाली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने देहदानावर सामाजिक संदेश देणारा लघुपट तयार केला. ग्रीस येथील इंडिपेंडंट व्हिडिओ फिल्म फेस्टिव्हल ऑफ यूट्यूब आर्ट क्लब पावलोस पराशाकिस या आंतरराष्ट्रीय महोत्सवात ऑर्गन डोनेशन आणि बॉडी डोनेशन या दोन्ही लघुपटांनी ऑस्कर मान्यता प्राप्त करून आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक विक्रम नोंदवला आहे. तालुका पातळीवर मेडिकल कॉलेजमधून आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेला हा पहिलाच लघुपट ठरला आहे.

देहदान हे सर्वश्रेष्ठ दान हे ब्रीद घेऊन अनेकदा देहदान करण्यासाठी जनजागृती करण्यात येते. मात्र, अनेकदा गैरसमजातून देहदान करण्यासाठी अनेक जण इच्छुक नसतात. मात्र, देहदानाबाबत जनजागृतीसाठी येथील कृष्णा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लघुपटाची निर्मिती केली आहे. त्यातून त्यांनी मरणोत्तर देहदान ही प्रक्रिया मृत्युपश्चात सहा तासांच्या आत होणे आवश्यक असते. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पार्थिवाचा अनेक दिवस उपयोग व्हावा, म्हणून फॉर्मेलिन इंजेक्शन प्रक्रिया केली जाते. 

फक्त नैसर्गिक मृत्यू झाल्यास देहदान करता येते. एड्स, कावीळ, नुकतेच ऑपरेशन झालेले मृत शरीर, अनेक वर्षे अंथरुणावर पडून असलेल्या व्यक्तीचे शरीर देहदानासाठी चालत नाही. याची माहिती व्हावी, यासाठी टायसन न्यूटन फर्नांडिस यांनी अ‍ॅनाटॉमी विभागप्रमुख डॉ. अंबाली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मित्रांच्या मदतीने कृष्णा विश्व विद्यापीठ, कराड प्रेझेंट्स या बॅनरखाली ऑर्गन डोनेशन आणि बॉडी डोनेशन हे चित्रपट तयार केले. ऑर्गन डोनेशन हा भावनिक आणि शैक्षणिक लघुपट आहे. त्यात अवयवदानाच्या माध्यमातून जीवन देण्याचा संदेश देतो. 

दुःखातून आशेपर्यंतचा प्रवास दाखवणारा हा लघुपट असून, त्यातून शरीर नश्वर असले, तरी आपले दान आपल्याला अमर बनवते, असा संदेश दिला आहे. हा लघुपट एम. ए. अ‍ॅनाटॉमीचे शुभम पवार, बीपीथचे टायसन न्यूटन फर्नांडिस यांनी तयार केला. त्याचे दिग्दर्शन फर्नांडिस यांनी केले. पटकथा शुभम पवार आणि फर्नांडिस यांनी लिहिली आहे. कलाकारांमध्ये शुभम पवार, टायसन फर्नांडिस, पार्थ अंधळे आणि यशराज गंधे यांचा समावेश आहे. ही कामगिरी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आणि विद्यापीठाच्या सामाजिक जनजागृतीसाठीच्या कटिबद्धतेचा उत्कृष्ट नमुना ठरली आहे. त्यांच्या यशाबद्दल कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले, विश्वस्त विनायक भोसले, एचओडी डॉ. एम. पी. अंबाली यांच्यासह मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

देहदानाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. ते दूर करून जास्तीत-जास्त लोकांनी देहदान, अवयव दान करावे, या हेतूने टायसन फर्नांडिस व त्यांच्या सहकारी मित्रांनी देहदानावर लघुपट तयार केला. तो ऑस्कर प्लॅटफॉर्मवर जागतिक विक्रम रचला ही अभिमानास्पद बाब आहे.

- डॉ. एम. पी. अंबाली, कृष्णा विद्यापीठ, कराड.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साहित्य संमेलनातील कवि कट्टयासाठी कविता पाठवण्याचे आवाहन
पुढील बातमी
कराड उत्तरमधील पाणंद रस्त्यांसाठी 7 कोटी : आ. मनोज घोरपडे

संबंधित बातम्या