सातारा : येथील ग्रंथ महोत्सव उद्या, दि. 7 पासून सुरू होत आहे. या चार दिवसांच्या महोत्सवात जिल्हा परिषद मैदानावर साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीपासून काढण्यात येणाऱ्या ग्रंथदिंडीने ग्रंथ महोत्सवाचा प्रारंभ होईल. ग्रंथ महोत्सवात प्रकाशकांचे अनेक स्टॉल दाखल झाले असून आबालवृद्धांना आपल्या पसंतीची पुस्तके खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
ग्रंथ महोत्सव दरवर्षी जानेवारी महिन्यात भरतो. मात्र, जानेवारी महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असल्यामुळे हा रौप्यमहोत्सवी ग्रंथ महोत्सव नोव्हेंबरमध्ये होत असून तो जिल्हा परिषदेच्या मैदानावर दहा नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. कर्मवीर समाधी परिसरात महाराजा सयाजीराव विद्यालयात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडीची सुरुवात होईल. नंतर महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांचे व्याख्यान आहे.
दुपारच्या सत्रात ‘सातारच्या साहित्य संमेलनाच्या आठवणी’ या विषयावरील परिसंवादात प्रा. इंद्रजित भालेराव, श्याम भुरके, संभाजीराव पाटणे, शिरीष चिटणीस, मुकुंद फडके, श्रीकांत कात्रे, अॅड. सीमंतिनी नूलकर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ‘सोनेरी चंदेरी’ हा गीतांचा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवात पुस्तकांच्या ५३ स्टॉल्सवर वाचकांना सवलतीमध्ये पुस्तके उपलब्ध होणार आहेत. वाचकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे व कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी केले आहे.