गंगा आली हो अंगणी आणि भगीरथालाच विसरले राजकारणी; शिवसेनाप्रमुखांचेच वावडे?

by Team Satara Today | published on : 25 November 2025


पुसेगाव,  (प्रकाश राजेघाटगे) -  पुराणात अशी आख्यायिका आहे की स्वर्गातील गंगा पृथ्वीवर येण्यासाठी भगीरथाने मोठे तप करून भगवान शंकराला प्रसन्न केले आणि वरदान म्हणून गंगा नदी पृथ्वीवर प्रकट झाली. त्यामुळे हिंदू पुराणात भगीरथाचे नाव अमर झाले. परंतु वर्तमानात दुष्काळी भाग असे वर्णन असलेल्या खटाव-माण या तालुक्याचा कलंक पुसणार्‍या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नामक भगीरथाचा विसर राजकारणी लोकांना पडला की काय, अशी चर्चा खटाव-माण तालुक्यात दबक्या आवाजात होत आहे.

सन 1995 साली शिवसेना भाजपाचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी दुष्काळी जनतेची गरज ओळखून शिवसेनाप्रमुख यांच्या कल्पक विचारातून जिहे-कठापूर योजना अंमलात आली. 1995 ते 99 दरम्यान या योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले. नंतरच्या काळात निधीच्या अभावी व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उदासीनतेमुळे हे काम रखडले गेले. तरीही शिवसेनेने ही योजना पूर्ण व्हावी यासाठी वारंवार आंदोलने केली. या आंदोलनात कित्येक शिवसैनिकावरचे गुन्हे आजही न्यायप्रविष्ट आहेत. तरीसुद्धा ही योजना पूर्णत्वाकडे जात असताना साधे शिवसेनाप्रमुखांचे नावही न घेणे, यातूनच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे संकुचित विचार दिसून येत आहेत.

शिवसेनाप्रमुखांचेच वावडे?

कोरेगाव खटाव मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी महेश शिंदे हे शिवसेनेचेच आमदार आहेत. पण त्यांनाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे वावडे असल्याचे दिसून येत आहे. हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत घेतली म्हणून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन मूळ पक्ष स्वतःकडे आहे, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात आणि त्यांच्याच पक्षाचा आमदार जिहे-कटापूर योजनेला वंदनीय बाळासाहेबांचे नाव द्यायला विरोध करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कै.लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव देण्यासाठी आग्रही असतो, तेव्हा हसावे की रडावे असाच प्रश्न तालुक्यातील जनतेच्या मनात आहे. कारण महेश शिंदे यांना विजयाचा गुलाल शिवसेनेच्या नावाने लागला आहे हे ते सोयीस्कररित्या विसरत आहेत.

प्रदेशाध्यक्षांनाही विसर?

आमदार शशिकांत शिंदे यांनी या योजनेचे पाणी पुजण्याचा घाट येत्या दोन-तीन दिवसात घातला आहे. परंतु त्यांच्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा साधा फोटो सुद्धा नाही. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सोबत अनेक निवडणुका आघाडी करून लढवत आहे. परंतु विद्यमान प्रदेशाध्यक्षांना ही आघाडी फक्त कागदावरच दिसत असेल असे दिसते. नाहीतर तेही या तालुक्याचे माजी लोकप्रतिनिधी होते. त्यांनाही माहित आहे की या योजनेसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान आहे. परंतु वर्चस्वाच्या लढाईत त्यांना याचा विसर पडलेला दिसतो.

शिवसेना उद्धव ठाकरे गटही निष्क्रीय?

जिहे-कटापूर योजना आता पूर्णत्वाकडे जात असताना श्रेय घेण्यासाठी अनेक पक्ष व नेते मंडळी बाह्या सरसावून पुढे येत आहेत. परंतु ज्यांच्यामुळे या योजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली व त्यांचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत, असे म्हणणारे शिवसेना उबाठा गटाचे नेते मूग गिळून बसले आहेत. आता आपल्या नेत्याचे स्वप्न पूर्ण होत आहे म्हणून आता खाजगीत आनंद साजरा करावा का, असा प्रश्न कट्टर शिवसैनिकांना पडत आहे. कारण महाराष्ट्रभर तोंडाचा पट्टा वाजवणारे पक्षाचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील याबाबत मौन बाळगून का आहेत, का त्यांची या प्रश्नावर दातखीळ बसली? कारण यावर कुठलीही प्रतिक्रिया शिवसेना उबाठा गटाने दिलेली नाही.

परतु सरतेशेवटी एवढेच म्हणावे लागेल, जिहे-कठापूर योजनेसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी व त्यांच्या शिवसेनेने प्रयत्न केले हे जगजाहीर आहे. परंतु जिल्ह्यातील नेत्यांच्या कावेबाज वृत्तीमुळे त्यांचे नाव आता कुठेही दिसत नसले तरी दुष्काळी जनतेचे खरे भगीरथ श्रीमान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच होत, असे नमूद करावे लागेल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संगमनगर येथून पार्किंग केलेलया दुचाकीची चोरी
पुढील बातमी
पुरोगामी महिलांच्या साहित्यावर व्याख्यानमाला; साताऱ्यातील पाठक सभागृहात शुक्रवारी होणार प्रारंभ

संबंधित बातम्या