दहिवडी : माण तालुक्यातील उकिर्डे गावचे सुपुत्र आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील हवालदार शेखर भीमराव जगदाळे (वय ४९) हे कर्तव्यावर असताना कैगा कारवार येथे हुतात्मा झाले. या दु:खद घटनेमुळे उकिर्डे गावासह संपूर्ण माण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
जवान शेखर जगदाळे यांचे पार्थिव उकिर्डे येथे पोहोचताच ग्रामस्थांनी भव्य मिरवणुकीतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “वीर जवान शेखर जगदाळे अमर रहे”, “भारत माता की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करून वीर जवानाला अखेरचा निरोप दिला.
अंत्यदर्शनावेळी पोलीस दलातील जवानांनी फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, नायब तहसीलदार श्रीकांत शेंडे, पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, कैगा कारवार येथील अधिकारी एस. बी. तरवाल, हवालदार संभाजी जांगळे, सहायक फौजदार कल्याण गायकवाड, कॉन्स्टेबल राहुल वाजे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शाब्दिक श्रद्धांजली वाहिली.
यावेळी आजी–माजी सैनिक संघटनेतर्फेही मोठ्या संख्येने पदाधिकारी हजर होते. यामध्ये बंडू कोकरे, चंद्रकांत ढेंबरे, श्रीमंत काळे, शांताराम शेंडे, महादेव इंदलकर, दत्तात्रय धडांबे, रामचंद्र इंदलकर, भाऊसाहेब खराडे, इंडियन एअरफोर्सचे उत्तमराव साळुंखे, शिवाजीराव फडतरे, महादेव कोकरे, सतीश कोकरे यांचा समावेश होता.
हुतात्मा शेखर जगदाळे यांचा मुलगा अथर्व, मुलगी श्रावणी, पत्नी अंजली आणि आई द्रुपदा यांना अश्रू अनावर झाले होते . शेखर जगदाळे हे सुस्वभावी, मनमिळाऊ आणि प्रेमाने बोलणारे व्यक्तिमत्त्व म्हणून गावात ओळखले जात होते. आठवडाभरापूर्वीच ते गावाला भेट देऊन सर्वांची विचारपूस करून पुन्हा कर्तव्यावर रवाना झाले होते. शनिवारी रात्री कंपनीच्या मोठ्या गेटचा एक भाग अचानक डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कैगा कारवार येथे मानवंदना दिल्यानंतर त्यांचे पार्थिव उकिर्डेला आणण्यात आले. सोमवारी सकाळी ९ वाजता उकिर्डे येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.