मुंबई : सोमवारी रात्री मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या भीषण बस अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला, तर 49 पेक्षा जास्त जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. या जखमी प्रवाशांवर उपचार सुरू असून त्यांना सायन आणि कुर्ला भाभा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे हा अपघात झाला. ही बस कुर्ला स्थानकातून अंधेरीला जात होती. ही बेस्ट बसे बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या अंतर्गत येते. याचदरम्यान आता बेस्ट चालक संजय मोरे याच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुर्ला परिसरातील गजबलेल्या लालबहादुर शास्त्री मार्गावर लोकांच्या गर्दीत भरधाव बस शिरुन हा अपघात झाला होता. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला, असे कारण प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, काहीजण या बसचा चालक संजय मोरे याच्याबद्दलही संशय व्यक्त करत आहेत. संजय मोरे याने मद्यपान केले होते का, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. तर कुर्ला बस अपघातात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक संजय मोरे याने मद्यप्राशन केलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच बसमध्ये तांत्रिक बिघाड ही नव्हता अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
संजय मोरे हा घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या असल्फा परिसरात राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. तर संजय मोरे कंत्राटी चालक म्हणून 1 डिसेंबरला बेस्टमध्ये रुजू झाला. मात्र संजय मोरेने काल (9 डिसेंबर) पहिल्यांदा बेस्ट चालक म्हणून काम केले. संजयने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याचे समजते. त्यामुळेच हा अपघात झाला. बसवरील नियंत्रण सुटले अन् कुर्लातील हा भीषण अपघात झाल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. संजय मोरे याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
“या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला आहे. या घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, काही जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.