शाहूपुरी परिसरात तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध वृद्धेची ५० हजारांची सोन्याची लूट

by Team Satara Today | published on : 10 December 2025


सातारा  : शाहूपुरी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दारावर जेवण मागण्यासाठी आलेल्या एका अज्ञात महिलेने वृद्ध महिलेला स्प्रे मारून बेशुद्ध केले आणि तिच्या अंगातील सोन्याचे दागिने लुटून पसार झाली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना मोहन जाधव (वय ५५), रा. जिजाऊ हाउसिंग सोसायटी, हिंदवी शाळेजवळ, या आपल्या घराबाहेर पोर्च साफ करत होत्या. त्याच वेळी अंदाजे ४५ वर्षांची एक अनोळखी महिला त्यांच्या घरासमोर आली. तिने भूक लागल्याचे सांगत जेवणाची विनंती केली. जाधव या जेवण आणण्यासाठी घरात गेल्या असता ती अनोळखी महिला त्यांच्या मागोमाग घरात आली.

यानंतर तिने तहान लागल्याचे कारण देत पाण्याची मागणी केली. जाधव पाणी देत असताना त्या महिलेने अचानक त्यांच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यामुळे जाधव बेशुद्ध पडल्या. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्या महिलेने जाधव यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी-मंगळसूत्र, मनी, तसेच कानातील सोन्याचे टॉप्स असा सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा ऐवज काढून चोरून नेला.

काही वेळानंतर शुद्धीवर आल्यानंतर जाधव यांनी त्वरित घरच्यांना माहिती दिली आणि पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून अज्ञात महिलेचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिर्के करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा येथील मंगळवार पेठ होलार गल्ली परिसरात जुन्या वादातून रस्ता अडवून लाकडी बॅटने मारहाण
पुढील बातमी
कास कला व संस्कृती यांच्यावतीने आणि सातारा रंगकर्मी यांच्या सहकार्याने कै . अंजली थोरात एकपात्री अभिनय स्पर्धा २० डिसेंबर रोजी

संबंधित बातम्या