सातारा : नवभारत साक्षरता अभियानाचा प्रचार व प्रसार अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती जावली शिक्षण विभाग व सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या वतीने प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात समाज प्रबोधनपर ओव्यांची निर्मिती करून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरला.
नवभारत साक्षरता अभियानांतर्गत सर्वांना शिकण्याची संधी मिळावी कोणीही असाक्षर राहू नये या उद्देशाने हे अभियान संपूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे. असाक्षरांचे सर्वेक्षण करून स्वयंसेवकांमार्फत त्यांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत . वय वर्ष 15 च्या पुढे असणाऱ्या सर्वांना शिकण्याची संधी त्यामुळे मिळणार आहे .
अशाच असाक्षरांच्या मनातील भावभावनांचे वर्णन सदरच्या ओव्यातून केले आहे. 'ओवी ' हा काव्यप्रकार काळाच्या ओघात हळूहळू कमी व्हायला लागला आहे. तसेच ग्रामीण भागातही जाते, दळण आणि ओव्या ही पारंपरिक पद्धत केवळ लग्न समारंभाच्या विधीसाठीच वापरली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गतकाळातील स्मृतींना उजाळा म्हणून अशा प्रकारे ओवीची रचना केली आहे.
या उपक्रमाची निर्मिती व संकल्पना बिरामणेवाडी शाळेच्या अंजली शशिकांत गोडसे यांनी केली. लेखनाची जबाबदारी मेढा शाळेच्या योगिता राजेश मापारी यांनी सांभाळली. आलेवाडी शाळेच्या प्रियांका श्रीराम किरवे यांनी वेशभूषा व संकलनात योगदान दिले तर मेढा शाळेच्या शिल्पा बाळासाहेब फरांदे यांनी विशेष सहाय्य केले.
उपक्रम साक्षर भारताच्या वाटचालीला वेग देणारा
उपक्रमाच्या यशामागे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी आणि गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या ओव्यांच्या माध्यमातून साक्षरतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्याबरोबरच लोकजागृतीही साधली गेली. गावागावांमध्ये साक्षरतेबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. हा अभिनव उपक्रम साक्षर भारताच्या वाटचालीला वेग देणारा ठरेल, यात शंका नाही.