फलटणमध्ये दुर्मीळ ऑर्किड वनस्पतीचा शोध; परिसरातील जैवविविधतेला नवी ओळख

by Team Satara Today | published on : 13 October 2025


सातारा : जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एक अत्यंत दुर्मीळ आणि आकर्षक ऑर्किड वनस्पती आढळल्याने निसर्गप्रेमी व पर्यावरणतज्ज्ञांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कोरड्या व काटेरी प्रदेशात आढळलेली ही वनस्पती आतापर्यंत केवळ दाट जंगलांमध्ये आणि दमट हवामानातच पाहायला मिळत होती.

पावसाळ्यामध्ये उगवणाऱ्या काही दुर्मिळ वनस्पती फलटण तालुक्यासारख्या गवताळ प्रदेशामध्ये येणारे प्रवासी पाहुणे पक्षी यांच्या नोंदी घेण्याचे काम पर्यावरण प्रेमींकडून केले जात आहे. असे असताना, ग्लोबल अर्थ फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक सचिन जाधव आणि सदस्य गणेश काकडे हे फलटण तालुक्यामध्ये नोंदी घेत असताना त्यांना बटरफ्लाय ऑर्किड वनस्पती आढळून आली.

ही ऑर्किड वनस्पती Pecteilis gigantea म्हणून ओळखली जाते. स्थानिक भाषेत तिला ‘वाघचोरा’ किंवा ‘बटरफ्लाय ऑर्किड’ असेही म्हटले जाते. तिच्या फुलांची रचना फुलपाखरू किंवा पक्षासारखी दिसत असल्यामुळे ती पाहणार्‍यांचे विशेष लक्ष वेधून घेते. सौंदर्याबरोबरच या फुलांना हलका सुगंधही असतो.

 या शोधाची वैशिष्ट्ये

फलटणसारख्या कोरड्या भागात प्रथमच या ऑर्किडची नोंद झाली आहे.

साधारणपणे अशा वनस्पती पावसाळी, सदाहरित जंगलांमध्ये आढळतात.

स्थानिक पर्यावरणात जैवविविधतेचे नवीन पुरावे अधोरेखित करणारा हा महत्त्वपूर्ण शोध आहे.

पर्यावरणीय महत्त्व

तज्ज्ञांच्या मते, ही ऑर्किड वनस्पती त्या भागातील जमिनीतील आर्द्रता, सूक्ष्म वनस्पती आणि परिसंस्थेच्या जतनाची साक्ष देणारी आहे. अशा प्रजातींचे संवर्धन केले तर भविष्यात फलटण तालुका वनस्पती संशोधनासाठी एक उल्लेखनीय बाब ठरू शकतो.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सासपडे प्रकरणातील आरोपीला तात्काळ फासावर लटकवा; मराठा क्रांती मोर्चा व ग्रामस्थांचा साताऱ्यात मोर्चा
पुढील बातमी
साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांची जोरदार निदर्शने; संविधान संघर्ष मोर्चाला विविध संघटनांचा प्रतिसाद

संबंधित बातम्या