अजितदादांची निवडणुकीआधी बारामतीकरांना साद

by Team Satara Today | published on : 02 September 2024


बारामती  : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज ही यात्रा अजित पवारांच्या बारामती मतदारसंघात आहे. भर पावसात अजित पवारांची जन सन्मान यात्रा सुरु आहे. अजित पवारांनी बारामतीत रोड शो केला. तेव्हा अजित पवारांचे शेकडो समर्थक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी या रॅलीत सहभाही झाले होते. रॅलीनंतर बारामतीतल्या मिशन हायस्कूल मैदानावर अजित पवारांची जाहीर सभा होत आहे. सभास्थळावर लाडकी बहिणी योजनेची बॅनरबाजी करण्यात आली आहे. निवडणुकीआधी या सभेतून अजित पवारांनी बारामतीकरांना साद घातली आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अजित पवारांची बारामतीत सभा होत आहे. या सभेतून अजित पवारांनी बारामतीकरांना साद घातली आहे. आज आपल्याला मंत्रिमंडळात संधी मिळाली. म्हणून निर्णय घेता आला. बारामतीत आता बदल होत आहे. आज लय पवार घरी यायला लागलेत. कधी आले नाहीत, असं लोक म्हणतील पण आता हे पण पवार आणि ते पण पवार घरी यायला लागले आहेत. मात्र पुढे काय करायचं हे तुमच्या हातात आहे, असं अजित पवार म्हणाले.

राज्यातील 287 मतदारसंघ आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त विकासनिधी आपल्या बारामतीत दिला. मी लवकरच बारामतीची ब्ल्यू प्रिंट काढणार आहे. बारामतीत कॅन्सर हॉस्पिटल काढणार आहे. अनेक योजना आपल्याला राबवायच्या आहेत. लोकांची कामं करण्याची धमक असली पाहिजे. नेतृत्व तसं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं.

भ्रष्टाचाराचे आरोप कुणी करता कामा नये. पुन्हा महायुतीचे सरकार आले तर योजना कायम सुरु राहणार आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांना 1500 रुपयांची किंमत काय कळणार आहे? आम्ही गरिबी भोगली आहे आहे. पुढचं लाईट बिल भरायचं नाही. मागच लाईट बिल मागायला आलेत तर मी बघतो…, असंही अजित पवार बारामतीच्या सभेत म्हणालेत.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालीय. यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. बारामती आता शिक्षणाचं हब झालं आहे. अनेकजण बाहेरून बारामतीत शिकायला येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे. बारामतीत आदरयुक्त दबदबा पोलिसांचा असला पाहिजे. आमच्या बारामतीतल्या मुलींची छेड काढली तर खपवून घेणार नाही. अजितदादांनी पोलिसांना टाईट केलं आहे. कुठल्या पक्षाचाही असो त्याच्यावर कारवाई करा, अशा सूचना अजित पवारांनी पोलिसांना दिल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेख हसीना यांना परत पाठवायचे की नाही हे भारतावर अवलंबून 
पुढील बातमी
मणिपूरमध्ये हिंसाचार 

संबंधित बातम्या