पुणे: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे माजी खासदार सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांचे आज (मंगळवार, ६ जानेवारी) पहाटे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कलमाडी यांनी पहाटे ३:३० च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव एरंडवणे येथील 'कलमाडी हाऊस' या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. दुपारी २ वाजेपर्यंत नागरिक व कार्यकर्ते त्यांचे अंत्यदर्शन घेऊ शकतील. त्यानंतर ३:३० वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
सुरेश कलमाडी यांचा जन्म १ मे १९४४ रोजी झाला होता. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी भारतीय वायुसेनेत 'पायलट' म्हणून सेवा बजावली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि पुण्याच्या राजकारणावर आपली वेगळी छाप पाडली. पुणे लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी केंद्रात रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्सचे ते मुख्य आयोजक होते.पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा 'पुणे फेस्टिव्हल' सुरू करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांचा मोठा वाटा होता. गेल्या काही वर्षांपासून ते 'डिमेन्शिया' (स्मृतिभ्रंश) या आजाराने त्रस्त होते आणि सक्रीय राजकारणापासून दूर होते. अलीकडेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यांच्या घरी जाऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.सुरेश कलमाडी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.