वीज कोसळून भोळेवाडीतील शेतकऱ्याचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 04 April 2026


कराड : कराड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तांबवे विभागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली असून, शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास भोळेवाडी येथील शिवारात वीज अंगावर पडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सतीश नाथा सूर्यवंशी (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

​तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू असल्याने वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच येरवळे येथील एका नारळाच्या झाडावर वीज पडली होती. ही घटना ताजी असतानाच काल दुपारी म्होप्रे, बेदलरे आणि भोळेवाडी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी सतीश सूर्यवंशी हे आपल्या पत्नी आणि वहिनीसह 'माळ' नावाच्या शिवारात भाजीपाला काढण्यासाठी गेले होते. अचानक सुरू झालेल्या पावसादरम्यान विजांचा कडकडाट सुरू झाला आणि सतीश यांच्या अंगावर वीज पडली. विजेचा धक्का इतका भीषण होता की, त्यांचे शरीर जागीच काळेनिळे पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

​विजांच्या तीव्र कडकडाटामुळे सतीश यांच्या पत्नी आणि वहिनी यांचीही काही काळ शुद्ध हरपली होती, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, काही वेळाने त्या दोघी शुद्धीवर आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार कल्पना ढवळे, मंडल अधिकारी प्रशांत कोळी, ग्राम महसूल अधिकारी सदानंद साठे आणि महसूल सेवक नंदा संकपाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सतीश सूर्यवंशी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जमावबंदीचे आदेश म्हणजे प्रशासनाला 'उशिरा सुचलेलं शहाणपण' - शशिकांत शिंदे
पुढील बातमी
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण: पीएसआय गोपाळ बदनेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

संबंधित बातम्या