छावा चित्रपटात शिर्के घराण्याचा विपर्यस्त इतिहास

नितीन राजेशिर्के यांचा आरोप; लक्ष्मण उत्तेकर यांनी खरा इतिहास सांगावा

by Team Satara Today | published on : 22 February 2025


सातारा : छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटात गणोजी व कान्होजी यांनी छत्रपती संभाजी महाराजांना मोघलांना पकडून दिले, असे दाखवले आहे. दिग्दर्शक उत्तेकर यांनी इतिहासाचा खरा अभ्यास करावा. तो चित्रपट छावा कादंबरीवर आधारित आहे. प्रत्यक्षात शिर्के घराणे छत्रपतींची एकनिष्ठ होते. गणोजी व कान्होजी हे गद्दार म्हणणे हे चुकीचे आहे. ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये तसा कोणताही पुरावा नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राजेशिर्के घराण्याचे तेरावे वंशज नितीन राजेशिर्के यांनी पत्रकार परिषदेत केले.

लक्ष्मण उत्तेकर यांनी स्वतः पुढे येऊन या वस्तुस्थितीचे समर्थन करावे. अन्यथा त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा राजेशिर्के यांनी दिला. यावेळी सातारा इतिहास संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. राजेंद्र शेलार, महेश देशपांडे, अरबाज शेख, इत्यादी उपस्थित होते.

राजेशिर्के पुढे म्हणाले, गणोजी व कानोजी अशी दोन नावे या छावा चित्रपटात उल्लेखित आहेत. गणोजी शिर्के व कान्होजी शिर्के हे स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांचे बंधू होत. राजेशिर्के व छत्रपती घराण्याची तीन पिढ्यांची सोयरीक होती. गणोजी यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिले आहे, असे म्हणणे अथवा चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणे चुकीचे आहे. कान्होजी शिर्के हे गद्दार होते, याला इतिहासात कोणताही साधार पुरावा नाही. लक्ष्मण उत्तेकर यांनी चित्रपटातील हा भाग वगळावा किंवा या संदर्भात राजेशिर्के घराण्याची एकनिष्ठता अभ्यासून या घराण्याचा खरा इतिहास समोर आणावा. अन्यथा त्यांच्यावर सातारा जिल्हा सत्र न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुंबई-गोवा महामार्गाच्या दर्जेदार कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे आग्रही
पुढील बातमी
समर्थ गावाची माझी वसुंधरा अभियानाने वेगळी ओळख; रोपट्याचे वाण वाटप

संबंधित बातम्या