रहिमतपूर : रहिमतपूरच्या विकासासाठी सुनील माने यांनी 2001 पासून प्रयत्न केले आहेत. त्यांची कारकीर्द रहिमतपूर पालिकेत प्रगतिशील राहिली आहे. त्यांच्यापेक्षा नंदना माने यांची कारकीर्द चांगली होईल. कारण, त्यांच्या मागे अजित पवार नावाची शक्ती उभी आहे. रहिमतपूरमधील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करावे. शहराच्या विकासात मी कमी पडणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
रहिमतपूर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ना. अजित पवार यांची सभा रोकडेश्वर मंदिरासमोरील बाजार पटांगणात झाली. यावेळी खासदार नितीन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, कराड उत्तरचे नेते उदयसिंह पाटील, विक्रमबाबा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सभेस नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
अजितदादा म्हणाले, सुनील माने यांच्याकडे रहिमतपूरच्या विकासाचे व्हिजन आहे. या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती संस्कृती केंद्र यांसारखे मोठे प्रकल्प उभे राहतील. एसटी बसस्थानक व सुसज्ज व्यापारी संकुलाची सुनील माने यांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सुनील माने यांनी तुमच्यासमोर ठेवलेल्या विकासाच्या सर्व संकल्पना निवडणुकीनंतर पूर्णत्वास येतील.
विकास पवार यांनी सूत्रसंचालन केले. आनंदा कोरे यांनी प्रास्ताविक केले. विद्याधर बाजारे यांनी आभार मानले.
सुनील माने यांना पक्षपातळीवर जबाबदारी द्या
सुनील माने यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचे शिवसेना नेते वासुदेव माने यांनी या सभेत कौतुक केल. सुनील माने यांना पक्षपातळीवर चांगली जबाबदारी द्यावी, अशी मागणी त्यांनी अजितदादांकडे केली.