कराड : संस्कृती आणि संयमाचा वारसा सांगणाऱ्या सातारा जिल्ह्यात सध्या एका विचित्र घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. कराड-पाटण मार्गावर रात्रीच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणीने घातलेला धिंगाणा आणि त्यानंतर चक्क चालत्या गाडीच्या बॉनेटवर बसून केलेली 'स्टंटबाजी' पाहून कराडकर अवाक झाले आहेत. या हाय व्होल्टेज ड्राम्या'चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कराड-पाटण मार्गावरील एका गजबजलेल्या चौकात रात्रीच्या वेळी अचानक गोंधळ सुरू झाला. एक तरुणी, जी कथितरित्या मद्यधुंद अवस्थेत होती, तिने भररस्त्यातच ठाण मांडले. येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना अडवत तिने सुरुवातीला रस्त्यावरच लोळण घेतली. मात्र, खरा थरार पुढेच होता. रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारला तिने अडवले आणि काही कळायच्या आतच ती थेट कारच्या बॉनेटवर चढून बसली.
चालकाने गाडी हळू चालवत तिला खाली उतरण्याची विनंती केली, पण या 'नशे'त तरुणीला कशाचेही भान उरले नव्हते. एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे ती बॉनेटवरच मांडी घालून बसली आणि चालत्या गाडीवर प्रवास करू लागली. तिचे हे धाडस पाहून रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी थबकली होती.
धक्कादायक बाब म्हणजे, भररस्त्यात एका तरुणीचा जीवघेणा खेळ सुरू असताना, तिथे उपस्थित जमावाने तिला वाचवण्याऐवजी किंवा रोखण्याऐवजी हुल्लडबाजी करण्यास पसंती दिली. अनेकांनी मोबाईल काढून व्हिडिओ शुटिंग सुरू केले, तर काही तरुणांनी शिट्ट्या वाजवून या प्रकाराची खिल्ली उडवली.
या घटनेमुळे पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी रस्त्यांवर होणाऱ्या हुल्लडबाजीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भररस्त्यात अशा प्रकारे कायदा हातात घेऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलिसांचा वचक उरला आहे की नाही? असा संतप्त सवाल आता 'सातारा टुडे'च्या माध्यमातून नागरिक उपस्थित करत आहेत.