कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिसऱ्या वाघीणीचा समावेश झाला आहे. मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेली ही लाडो नावाची वाघीण आज, शनिवारी सकाळी कोयना अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आली. यामुळे सह्याद्री मधील एकूण वाघांची संख्या आता सहा झाली आहे.
लाडो ही वाघीण गुरुवारी सायंकाळी ५ वाजता पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून पकडली होती. त्यानंतर रस्ते मार्गाने तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले. पुढे बोटीने प्रवास करून शुक्रवारी रात्री कोयना अभयारण्यात पोहोचवण्यात आले. येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची सखोल तपासणी केली. तिला पाणी व मांसाहार देण्यात आला असून, तो तिने व्यवस्थित स्वीकारला. शनिवारी सकाळी ६ वाजता कोयना अभयारण्याच्या कोअर जंगल क्षेत्रातील सुरक्षित ठिकाणी तिला मुक्त करण्यात आले.
कोयना अभयारण्यात आधीपासून असलेल्या नर वाघ एसटीआर-०३ ‘बाजी’च्या जोडीला ही नवीन वाघीण एसटीआर-०६ दाखल झाल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली आहे. यामुळे भविष्यात वन्यजीव संवर्धनासह पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १,१६५ चौ. किमी क्षेत्रफळ पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत पसरलेला १,१६५ चौ. किमी क्षेत्रफळाचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध असून, अनेक दुर्मिळ प्रजातींचे आश्रयस्थान आहे. हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो.
यांनी घेतला सहभाग
हे संपूर्ण ऑपरेशन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. उपसंचालक किरण जगताप, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाक्के, परिक्षेत्र वनाधिकारी संग्राम गोडसे (फिरते पथक), अक्षय साळुंखे (कोयना), विजय बाटे (बामणोली), तुषार जानकर (पाटण), अक्षय करमळकर (कांदाट), मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सुनील भोईटे तसेच वनपाल व वनरक्षकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
पेंच व्याघ्र प्रकल्पात या वाघीणीचा क्रमांक होता पिटीआर -१२३
सह्याद्रीतील ‘हिरकणी’ पेंच व्याघ्र प्रकल्पात या वाघीणीचा क्रमांक पिटीआर -१२३ होता. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाल्यानंतर तिला एसटीआर-०६ हा शासकीय क्रमांक देण्यात आला असून, सह्याद्रीतील गाईड मंडळींनी तिला प्रेमाने ‘हिरकणी’ असे नाव दिले आहे.