सातारा : कराड तालुक्यातील वडगाव येथील हिंदू वडार समाजातील विद्यार्थिंनींना कराड तहसीलदारांनी जातीच्या दाखल्यांपासून वंचित ठेवले असून याबाबत तातडीने निर्णय घेवून विद्यार्थिंनीना दाखले उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा सातारा जिल्हा दलित महासंघाचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिला आहे.
याबाबत उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कराड तालुक्यातील वडगाव येथील पूजा बाबू चव्हाण, गायत्री बाबू चव्हाण, राधिका बाबू चव्हाण, भाग्यश्री बाबू चव्हाण, अश्विनी मिथुन धोत्रे, शुभांगी मिथुन धोत्रे आणि शुभ्रा मिथुन धोत्रे या मुली इयत्ता अकरावी मध्ये शिक्षण घेत आहेत. त्या हिंदू वडार या भटके विमुक्त जातीच्या असून शैक्षणिक कारणासाठी त्यांनी त्यांचे जातीचे दाखले मागितले आहे. मात्र, गेल्या आठ नऊ महिन्यापूर्वी कराड तहसीलदारांकडे केवळ सहीसाठी दाखले पडून आहेत.
विद्यार्थिनींना अनेक दिवसांपासून हेलपाटे मारून सुद्धा दाखले मिळत नाहीत. शासनाने पन्नास वर्षांपूर्वीचा पुरावा असणारा जीआर रद्द करून स्थानिक पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांचा अहवाल ग्राह्य धरून दाखले देण्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, असे असताना कराडचे तहसीलदार, प्रांत अधिकारी जाणून बुजून दाखले देण्यास टाळाटाळ करत आहेत. तात्काळ दाखले देण्याबाबत कारवाईचे आदेश देण्यात यावे अन्यथा दलित महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केेले जाईल.