सातारा : महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सेवानिवृत्त झालेले 14000 कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2025 ची निवृत्तीवेतनाची रक्कम अद्याप मिळालेली नाही .ती रक्कम तत्काळ मिळावी तसेच वित्त विभागासह पाणीपुरवठा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तांत्रिक विभाग यांना सक्तीची ताकीद देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी संघटनेने केली आहे.
याबाबतचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सादर करण्यात आले .संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सा .रा अग्रवाल, कार्याध्यक्ष सी .बी जाधव, एस एस चव्हाण, प्रकाश मेघे , ए. म. रोडे, पि. के. सावंत, राजाराम विताळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
संघटनेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद आहे की राज्यात 14000 प्राधिकरणाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित दादा पवार यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाची रक्कम एक तारखेला त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे उत्तर दिले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाची जबाबदारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांची आहे .मात्र वित्त विभागाकडून या निवृत्ती वेतनाची रक्कम देण्यामध्ये विलंब होत आहे .बहुतांश सेवानिवृत्त कर्मचारी हे वयाची सत्तरी पार केलेले असून काहींना दुर्धर आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या दैनंदिन गरजा औषध उपचार या निवृत्तीवेतनाच्या रकमेवर अवलंबून आहेत. सर्व कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन दर महिन्याच्या एक तारखेला जमा व्हावे .आणि संबंधित विभागाला सक्त ताकीद देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.