वनताराची टीम नांदणीला देणार भेट

हत्तीणीसाठी सर्वपक्षीय नेते धावले मठाकडे

by Team Satara Today | published on : 01 August 2025


कोल्हापूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीणीचा राधे कृष्ण एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट, जामनगर (गुजरात) येथे हस्तांतरण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. परिणामी नागरिकांनी जिओ कार्डवर बॉयकॉट करण्यास सुरुवात केली. यामुळे याची गंभीर दखल घेत वनताराचे सीईओ विहान करणी यांच्यासह टीम नांदणी मठातील महाराजांशी चर्चा करण्यासाठी कोल्हापूरला येणार आहे.

सर्वपक्षीय नेते धावले नांदणी मठाकडे

जयसिंगपूर : समाजमाध्यमांमधून मोठ्या प्रमाणात महादेवी हत्तिणीबद्दल धुरळा उडाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी नांदणी (ता. शिरोळ) येथील मठाकडे धाव घेतल्याचे चित्र गुरुवारी दिसले. आमदार सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम राबवून राष्ट्रपतींची भेट घेण्याचा मनोदय व्यक्त केला, तर अन्य आजी-माजी आमदारांनी हत्तिणीला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

नांदणी येथे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात दिवसभरात आमदार पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार अशोकराव माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार राजू आवळे, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, भाजपचे नेते सावकार मादनाईक, दक्षिण भारत जैन सभेचे मुख्य महामंत्री अनिल बागणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन महादेवी हत्तिणीबाबत स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्याशी चर्चा केली.

महादेवी हत्तिणीला मठाकडे ठेवावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात यापूर्वी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका फेटाळल्याने हत्तिणीला रवाना करण्यात आले. आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे.

नांदणी येथील मठातील ‘महादेवी’ हत्तिणीला पुन्हा मठात आणण्यासाठी पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी नवी दिल्लीत त्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. स्थानिक नागरिकांनी गेल्या चार दिवसांत केलेली आंदोलने, त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया याची माहिती महाडिक यांनी मंत्र्यांना दिली.

 ‘एक स्वाक्षरी महादेवीला आपल्या घरी आणण्यासाठी’ ही मोहीम सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर प्रचंड लोकप्रिय झाली आहे. जिल्ह्यात फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटरवर हे क्यूआर कोड व्हायरल केले जात आहेत. विशेष म्हणजे, मोबाइलवर तर स्टेटसचा अक्षरश: पाऊस पडला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अकलाई देवस्थान तीर्थस्थळ दर्जासाठी प्रयत्नशील
पुढील बातमी
कोयनेत पावसाचा जोर कमी

संबंधित बातम्या