सातारा : सातारा ही क्रांतिकारकांची आणि संघर्ष करणारी भूमी आहे. सत्ताधार्यांनी विकासाची मोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात काहीच केले नाही. येथे विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होतो त्यामुळे भविष्यात लोकशाही जिवंत राहील की नाही याची भीती आहे. सातारकरांनी परिवर्तनाची एक संधी द्यावी सातार्याचं सोनं करून दाखवतो, असे कळकळीचे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
येथील गांधी मैदानावर महाविकास आघाडीच्या प्रचाराचा मंगळवारी नारळ फुटला. यावेळी सभेला संबोधित करताना शिंदे बोलत होते. मंचावर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नरेंद्र देसाई, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या रजनीताई पवार राजेंद्र शेलार,पद्मश्री व पदमश्री लक्ष्मण माने, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णाताई पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्रदादा पाटील, शहर सुधार समितीचे अस्लम तडसरकर, अॅड. वर्षा देशपांडे व महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.
शशिकांत शिंदे म्हणाले, हद्द सोडायची नाही ही सातार्याच्या राजकारणाची अनेक वर्षांपासूनची पद्धत आहे. मी मात्र पक्ष वाढीसाठी ही चौकट ओलांडून त्याची राजकीय किंमत सुद्धा मोजली. नगरपालिकेची ही लढाई फक्त नगरपालिकेची नाही तर तत्त्वाची आहे. भारतीय जनता पार्टीने जातीय संघर्ष तयार करून सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे त्याला वाचा फोडण्याचे काम आम्ही करत असून लोकशाही जिवंत राहील यासाठी ही धडपड सुरू आहे. महायुतीच्या घटक पक्षांची अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी आहे सातारकरांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एक संधी देऊन त्यांना सत्तेत आणावे आम्ही निश्चित सातारा सातारकरांच्या स्वप्नातला घडवून दाखवू. ही भूमी क्रांतिकारकांची आणि परिवर्तनाची आहे हे परिवर्तन आपण घडवून संपूर्ण देशाला बदलाचा संदेश द्यायला पाहिजे, एकदा बदल घडवून मला परिवर्तनाची एक संधी द्या, असे आवाहन शशिकांत शिंदे यांनी केले. सातारा जिल्ह्याच्या राजकारणातून यशवंत विचारांचा वारसा भाजपला संपवायचा आहे, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही बदलला नाहीत तर विरोधक म्हणून तुम्ही कधी आवाज उठवू शकणार नाही असे ते म्हणाले.
महादेव जानकर म्हणाले, संविधान वाचवण्यासाठी भारत व महाराष्ट्र भाजप मुक्त करावा लागेल त्यासाठी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र यायला हवे कॅबिनेट मंत्री असताना भारतीय जनता पार्टीचे षडयंत्र आम्हाला समजले नाही पण लवकरच हे प्रकरण आपले नाही हे आमच्या लक्षात आले. जातीय भांडणे लावण्याचे उद्योग भारतीय जनता पार्टीने केले आहेत. तुतारी, मशाल, हात या चिन्हावर लढणार्या कार्यकर्त्यांना संधी द्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नरेंद्र पाटील, असलम तडसरकर, काँग्रेसचे राजेंद्र शेलार यांनी आपली मनोगत व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पक्षी जाहीरनाम्याचे आमदार शशिकांत शिंदे तसेच मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सातार्याच्या विकासासाठी मला तुमची साथ हवीय : सुवर्णाताई पाटील
सुवर्णाताई पाटील म्हणाल्या, गेली 16 वर्षे आम्ही निष्ठेने भारतीय जनता पार्टीचे काम केले मात्र काम करतो म्हणून आम्हाला उमेदवारी नाकारण्यात आली मात्र जनतेने मला नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आणले आहे. समाजाला परिवर्तनाची गरज आहे त्यामुळे मी न थांबण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षांच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. सातारा ही माझी कर्मभूमी आहे आणि ती चांगल्या पद्धतीने मला घडवायची आह. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. पाच वर्षात सातारकरांनी चांगल्या कामासाठी माझं नाव काढावे ही माझी इच्छा आहे लोक हिताचे समाजकारणच मी करणार आहे फक्त तुमच्या साथीची गरज आहे एक संधी द्याल तर सातारा निश्चित चांगल्या पद्धतीने घडवू, असा स्पष्ट आशावाद सुवर्णाताई पाटील यांनी व्यक्त केला.
गांधी मैदान हाऊसफूल
सातार्याच्या गांधी मैदानाला मोठा इतिहास आहे. या गांधी मैदानावरुन प्रसारित झालेल्या विचारांनी नेहमीच क्रांती घडवली आहे. कोणीही मोठे नेते नसताना गांधी मैदानावर सभा घेण्याचे ठरले तेव्हा मी सांशक होतो. मात्र, कार्यकर्त्यांनी सांगितले. सभा गांधी मैदानावरच होईल आणि हाऊसफूल होईल. कार्यकर्त्यांचा हा गाढ विश्वासच महाविकास आघाडीच्या विजयाची नांदी असून परिवर्तन घडवण्यासाठी आलेल्या नागरिकांनी मैदान हाऊसफूल भरले आहे. त्यामुळे सातार्याची जनता परिवर्तनाच्या लढ्यात सक्रीयपणे सहभागी झाली असून लोकशाही वाचवण्यासाठी पेटलेली ठिणगी महविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करणार असल्याचा विश्वास आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.