लातूर : लातूर जिल्ह्यातील नदी, नाले, ओढ्यांना पूर आल्याने ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बाधित झाले, ज्या ठिकाणी घरांमध्ये पुराचे पाणी शिरले, अशा ठिकाणी स्वच्छता आणि आरोग्य विषयक उपाययोजना प्रभावीपणे राबवा. पुरानंतर येणाऱ्या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने पूरग्रस्त भागात शिबिरांचे आयोजन करून नागरिकांची तपासणी करावी, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या नुकसानीच्या मदत वाटपाच्या अनुषंगाने पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, अहिल्या गाठाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित होते. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
पुरामुळे बाधित झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण तातडीने हाती घ्यावे. पूर परिस्थितीनंतर साथीचे आजार पसरण्याची शक्यता लक्षात घेवून आरोग्य विभागाने सतर्क राहून काम करावे. पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची पुढील काही दिवस नियमित तपासणी करावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये साथीच्या आजारावरील उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध असल्याची खात्री करावी. विशेषतः पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करून नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील बाधित कुटुंबांना तांदूळ, तुरडाळ वाटपाची कार्यवाही गतीने करावी, असे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या नुकसानीची मदत वाटप लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वच तहसीलदार यांनी या कामाला प्राधान्य द्यावे. सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचे पंचनामेही तत्काळ पूर्ण करावेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी प्रत्येक नुकसानीची नोंद पंचनाम्यात करावी. पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे काळजीपूर्वक करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. पुढील काही दिवसात परतीचा आणखी पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पाटबंधारे विभागाने सतर्क राहून सिंचन प्रकल्पातील पाणी पातळी योग्य प्रमाणात नियंत्रित करावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील शेतपिकांचे नुकसान, घरांची पडझड, पंचनामेविषयक सद्यस्थिती, मदत वाटप याबाबत माहिती दिली. तसेच सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरु असून लवकरच याबाबतचा अहवाल सादर होईल. तसेच ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या नुकसानीच्या मदत वाटपाची कार्यवाही गतीने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.