फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण: पीएसआय गोपाळ बदनेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

by Team Satara Today | published on : 04 April 2026


फलटण : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी अटकेत असलेले पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला असून त्यांचा जामीन मंजूर केला आहे. जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर बदने यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर न्यायमूर्ती सचिन एस. देशमुख यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

​सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि एक किंवा दोन जामीनदारांच्या अटीवर बदने यांची सुटका करण्याचे आदेश दिले. जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही कडक अटीही घातल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नये, पुराव्यांशी छेडछाड करू नये, न्यायालयीन कामकाजाच्या प्रत्येक तारखेला हजर राहावे आणि तपासासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे तपास अधिकार्‍यांकडे जमा करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

​या प्रकरणात बदने यांच्या वतीने अ‍ॅड. गिरीश वाणी आणि निरंजन ढाके यांनी बाजू मांडली, तर सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. पी. पी. देवकर यांनी काम पाहिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वीज कोसळून भोळेवाडीतील शेतकऱ्याचा मृत्यू
पुढील बातमी
शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष; साताऱ्यातील आर्किटेक्टची ५७ लाखांची फसवणूक

संबंधित बातम्या