सातारा : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात महायुतीला तगडी स्पर्धा देण्याच्या दृष्टीने मोर्चे बांधणी केली आहे. या तयारीचा एक भाग म्हणून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी पक्षानेराष्ट्रवादी भवनामध्ये गुरुवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये स्वतः शशिकांत शिंदे यांनी उमेदवारांशी संवाद साधून त्यांचे इलेक्शन मेरिट जाणून घेतले.
यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी अभयसिंह जगताप,शफिक शेख, डॉ. नितीन सावंत, दीपक पवार, नरेश देसाई, सरचिटणीस राजकुमार पाटील, पार्थ पोळके दिलीप बाबर, गोरखनाथ नलावडे, पारिजात दळवी इत्यादी यावेळी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यामध्ये दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 115 प्रभागातून 233 उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. या उमेदवारांसाठी तीन लाख 53 हजार मतदार मतदान करणार आहेत. ही गणिते लक्षात घेऊन राष्ट्रवादी पक्षाने आज प्रत्यक्ष उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी सात जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज केला आहे. यामध्ये सातारा हिल मॅरेथॉन चे संस्थापक संचालक डॉ. संदीप काटे, पत्रकार सुजित आंबेकर, पत्रकार शहर संघाचे माजी अध्यक्ष पत्रकार शरद काटकर, बाळासाहेब बाबर इत्यादी उमेदवारांनी थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची संधी मागितली आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांनी उमेदवाराचा परिचय त्याचे सामाजिक कार्य जनसंपर्क सामाजिक चेहरा या सर्व निकषांची जाणीवपूर्वक पडताळणी केली. लागीर झालं या प्रसिद्ध मालिकेचे पट कथाकार तेजपाल वाघ यांनी वाईमधून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची तयारी केली असून तशी इच्छा त्यांनी मुलाखती दरम्यान शशिकांत शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. सकाळी 11 ते दुपारी साडेचार या दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी सात तर नगरसेवक पदासाठी 65 जणांचे अर्ज राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाला प्राप्त झाले आहेत यामध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी अजूनही धक्का तंत्र देण्याची तयारी चालवल्याचे पत्रकारांना सांगितले. अनेक दिग्गज नाराज राष्ट्रवादीच्या संपर्कात असून त्यांची नावे योग्य वेळी जाहीर करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.