सातारा : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गाव-खेड्यांचा विकास सुरू असून ग्रामस्थांनी देखील याबाबत पुढाकार घेतला पाहिजे. हे अभियान म्हणजे ग्रामविकासाची चळवळ आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत येत्या १०० दिवसात विकासाची मोठी चळवळ संपूर्ण राज्यात उभी राहील, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
गोंदवले बुद्रुक येथील शेतकरी भवन कार्यालय येथे आज ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माणच्या उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, पंचायत समिती खटाव (वडूज) गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
गावच्या विकासासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी व ग्रामविकास अधिकारी यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे सांगून मंत्री श्री. गोरे म्हणाले, प्रत्येक गाव सर्वार्थाने समृद्ध होण्यासाठी, केंद्र आणि राज्याच्या सर्व योजनांची १०० टक्के अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी योजनांची अमंलबजावणी करणाऱ्या लोकप्रतिनिधींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन योगदान देणे गरजेचे आहे. शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी केली तर गावची कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील. राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याकरिता तालुका जिल्हा महसूल विभाग व राज्यस्तरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभिमान राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.येत्या 100 दिवसांत मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान मोठी चळवळ म्हणून उभी राहील असे काम करा, असे आवाहनही श्री. गोरे यांनी केले.
या कार्यशाळेत पंतप्रधान घरकुल आवास योजना टप्पा २ अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना तुकडेबंदी कायद्यांतर्ग खटाव तालुक्यातील १८ माण तालुक्यातील ५ लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करुन दिली आहे, त्याचे पत्र ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले. तसेच ३५ दिवसाच्या विक्रमी कालावधीत घरकुल पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा सत्कार मंत्री गोरे यांनी केला.
प्रारंभी संत गाडगेबाबा महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.