कोपर्डे प्रतिष्ठानचे पुरस्कार स्त्रीशक्तीचा सोहळा - डॉ. भारती पाटील; सात-तारा जीवनगौरव पुरस्कार इंदवी तुळपुळे यांना प्रदान

by Team Satara Today | published on : 31 January 2026


सातारा :  महात्मा  फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी स्त्री शक्तीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी  भारतात स्त्री पुरुष समतेचे बीजारोपण केले. तो विचार समाजामध्ये रुजवणाऱ्या   प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानचे जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार हे स्त्री शक्तीचा  सन्मान करणारे आहेत, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख, ज्येष्ठ अभ्यासक डॉ. भारती पाटील यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती वर्षाच्या सुवर्ण महोत्सवा निमित्ताने  २०२५ चा साहित्य क्षेत्राचा कृष्णामाई जीवनगौरव पुरस्कार जयसिंगपूर येथील ज्येष्ठ कवी, कादंबरीकार  नीलम माणगावे  यांना व समाज परिवर्तन  क्षेत्राचा सात-तारा जीवनगौरव पुरस्कार मुरबाड -ठाणे येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या इंदवी तुळपुळे  यांना चाळीस हजार रुपयांचा धनादेश, मानचिन्ह, शाल पुष्पगुच्छ व सातारा कंदी पेढे या स्वरूपातील पुरस्कार डॉ. भारती पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या स्मृतिदिनी आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात  त्या बोलत होत्या.

विचारमंचावर  प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ  कवी, लेखक  प्रमोद मनोहर कोपर्डे, साहित्य समीक्षक, अभ्यासक डॉ. गजाननअपिने पुणे, कवी वसंत शिंदे सातारा,ज्योत्स्ना पाटील- शिंदे मुंबई उपस्थित होते.  यावर्षीच्या पुरस्काराचे हे पाचवे तर एकूण पुरस्काराचे दहावे वर्ष होते. यावेळी प्रमोद मनोहर कोपर्डे यांच्या आर्ष पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या "बभ्रा" या कादंबरीचे औपचारिक प्रकाशन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात  आले.

जीवनगौरव पुरस्काराने पाठबळ, प्रोत्साहन मिळाल्याची भावना पुरस्कार विजेत्या इंदवी तुळपुळे, नीलम माणगावे यांनी सत्काराला उत्तर देताना  व्यक्त केली.

प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस  पुष्प अर्पण करून मान्यवर पाहुण्यांनी अभिवादन केले.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.भारती पाटील यांचे 'स्त्री - पुरुष समानता आणि आजचे वास्तव 'या विषयावर मौलिक भाषण झाले.  त्या आपल्या भाषणात म्हणाल्या, फुले -आंबेडकर - गांधीजी या थोर युगपुरुषांनी समताधिष्ठित समाज निर्मितीचे स्वप्न पाहिले. ते खऱ्या अर्थाने साकार होण्यासाठी लोकशाही व भारतीय संविधानाची मूल्ये समाजात रुजवण्याची नितांत गरज आहे. स्त्रीमुक्ती नव्हे  तर स्त्री-पुरुष समता, निरोगी सहजीवन आपल्याला हवे आहे.  

प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मनोहर कोपर्डे यांनी उपक्रमा मागील भूमिका विशद  करून भारतीय संविधान  उद्देशिका व त्याची मूल्ये टिकविली पाहिजेत असे सांगितले.  सविता कारंजकर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ग्रामीण रोजगारातील धोरणात्मक वळण: व्हीबी जी रामजी आणि विकासाची नवी चौकट
पुढील बातमी
प्रजासत्ताक दिन सोहळ्यात शिक्षण प्रसारक संस्थेतील बालकलाकारांचे बहारदार सांस्कृतिक सादरीकरण

संबंधित बातम्या