सातारा : कोरेगाव तालुक्यातील कोलवडी येथे सातारारोड-पळशी रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने चुकीच्या दिशेने जाऊन 11 वर्षाच्या मुलीला जोरदार ठोकर दिली. त्यामध्ये ती जागीच ठार झाली. त्यानंतर कारचालकाने अन्य दुचाकीला धडक दिली आणि कार सोडून पळून गेला.
या अपघातप्रकरणी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात मध्यरात्री दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपघातात ठार झालेल्या कोलवडी येथे इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेली शालेय विद्यार्थिनी जान्हवी सतीश जगदाळे हिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने व वाहनचालकाला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा पवित्रा घेतल्याने सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मोठा तणाव निर्माण झाला होता.
याबाबत सातारारोड पोलीस दूरक्षेत्र येथून समजलेल्या माहितीनुसार, कोलवडी गावच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पांढर्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार क्र. एमएच 11 बीएक्स झिरो 0250 ही भरधाव वेगाने आली आणि चुकीच्या दिशेने जाऊन कारचालकाने जान्हवी सतीश जगदाळे, वय 11 हिला जोरदार ठोकर दिली. त्यामध्ये ती जागीच ठार झाली. त्यानंतर कारचालकाने पुढे जाऊन एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीचे मोठे नुकसान झाले आणि दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले. या अपघातानंतर कार सोडून चालक पळून गेला. दुचाकीवरील रामदास दत्तू दिसले आणि सुशांत रामदास दिसले दोघे रा. परतवडी हे जखमी झाले आहेत.
अपघाताचा मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांसह युवकांनी कोलवडीच्या मुख्य चौकात गर्दी केली होती. त्यानंतर तातडीने जखमींना उपचारार्थ दाखल केले. जानवी हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात नेला. रुग्णालयात लवकर शवविच्छेदन न झाल्याने नातेवाईकांचा संताप अनावर झाला. त्यातच कार चालकाला पोलिसांनी अटक न केल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास आणि अंत्यविधी न करण्याचा पवित्रा घेतला. मोठ्या प्रमाणावर जमाव मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सातारारोड पोलीस दूरक्षेत्र आवारात जमला होता. पोलीस अधिकार्यांनी नातेवाईकांशी चर्चा करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नंतर त्यांची समजूत घालण्यात पोलिसांना यश आल्याने मुलीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मुलीच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी पिडीत कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे. ज्योतीराम एकनाथ जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे तपास करत आहेत.