कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील मौजे कुमठे गावच्या हद्दीत एकाने तक्रारदार यांच्या घरासमोरुन जबरदस्ती घरात घुसून तक्रारदाराच्या पत्नीला मारहाण करत विनयभंग केल्याची घटना घडली. बुधवारी (दि. २१) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून शुक्रवारी याप्रकरणी कोरेगाव पोलिसांत संबंधित महिलेच्या पतीने तक्रार दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार पंकज राजंद्र शिंदे (रा. कुमठे) याच्याविरुध्द याप्रकरणी कोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांची माहिती अशी, या घटनेतील संशयित आरोपीने फिर्यादीच्या घरात घुसल्यानंतर त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर अंगाशी लगट करत तिला खाली पाडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच तक्रारदारास धक्काबुक्की करत ''तुला जिवंत सोडणार नाही, खलास करून टाकतो'' अशी धमकी दिली. याच वेळी आरोपीने तेथे पडलेला दगड उचलून तक्रारदाराच्या डोक्यात मारून गंभीर जखम केली. पुढे त्याने आपल्या जवळील चाकू काढून हल्ला करण्याच्या उद्देशाने अंगावर धाव घेतली. आरोपीने जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ करत अपमानास्पद शब्दांत धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून उपविभागीय अधिकारी राजश्री तेरणी या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.