सातारा : महामार्ग ओलांडताना दुभाजकावर उभ्या असलेल्या पादचार्याला कारने जोराची धडक दिली. त्यामध्ये पादचार्याचा मृत्यू झाला. पुणे-बंगळूरू आशियाई महामार्गावर वाठार, ता. कराड गावच्या हद्दीत गणेश पेट्रोल पंपाजवळ रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
संजय पांडुरंग देसाई (वय 55, रा. वाठार) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठार येथील संजय देसाई हे रविवारी दुपारी पुणे-बंगळूर आशियाई महामार्ग ओलांडत होते. महामार्ग ओलांडण्यासाठी ते दुभाजकावर उभे असताना कोल्हापूर बाजूकडून आलेल्या कारने त्यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला, छातीला व पायाला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत महबूब चांदसाब मुलाणी यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातप्रकरणी कारचालक मुकुंद मधुकर भट (रा. दत्त मंदिर रोड, वाकड, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.