सातारा : येथील राजवाडा परिसरातील श्री समर्थ सेवा मंडळाच्या समर्थ सदन, संत ज्ञानपीठ सांस्कृतीक केंद्र येथे प्रतिवर्षाप्रमाणे दासनवमी उत्सवानिमित्त श्रीमत दासबोध ग्रंथाचे पारायण समर्थ भक्त बाळूबुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या कार्यक्रमात दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत ब्रहाचैतन्य भजनी मंडळ, सातारा यांचे भजन होणार असून त्यानंतर दि. ४ फेब्रुवारी रोजी सियाराम भजनी मंडळ व दि. ७ फेब्रुवारी रोजी रामकृष्ण पाठशाळेचे स्तोत्र पठण संपन्न होणार आहे. दासनवमी कार्यक्रमांमध्ये कीर्तन व प्रवचन सेवेदरम्यान सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सोमवार, दि. २ रोजी सौ. प्रीती करंदीकर, पुणे आणि सहकाऱ्यांचे गायन होणार असून मंगळवार दि. ३ फेब्रुवारी रोजी वाई येथील ज्येष्ठ पत्रकार, समर्थभक्त मधुसूदन नेने यांचे प्रवचन होणार आहे. दि. ४ रोजी सायंकाळी ६ वाजता अॅड. अमित द्रविड यांचे गायन होणार आहे.
गुरुवार, दि. ५ रोजी सौ. मीना सुपनेकर, सौ. मयुरी जोशी, सौ. दीपश्री सुकाळे, सौ. केतकी ताटके, बाळासाहेब चव्हाण, सुतार, सुहास फडके, अॅड. अमित द्रविड व ए. आर. कुलकर्णी यांचे गायन होणार आहे. शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी रोजी अरविंद कुलकर्णी आणि सहकारी भक्ती गीते सादर करणार आहेत. शनिवार दि. ७ रोजी समर्थ भक्त नंदकुमार देशपांडे यांचे प्रवचन, रविवार दि. ८ रोजी मंजुषा पाटील यांचे गायन होणार आहे. या कार्यक्रमासाठी सातारा येथील रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट हे सह प्रायोजक म्हणून लाभले आहेत. सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी सौ. प्रज्ञा लाटकर आणि सहकार यांचे गायन होणार असून मंगळवार दि.१० फेब्रुवारी रोजी समर्थभक्त दीपा भंडारे यांचे कीर्तन होणार आहे. दि.११ फेब्रुवारी रोजी दासनवमी निमित्त दासबोध ग्रंथ वाचन पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे.
सर्व कार्यक्रमांना समर्थ भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, कार्याध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले व कार्यवाह योगेशबुवा रामदासी यांनी केले आहे.