सातारा : माण तालुक्यातील बोडके येथे दुर्गा उत्सव मंडळाच्या समोर हाणामारीची घटना दि. 23 राज रात्री 11.30 वाजता घडली असून परस्पर विरोधात तक्रारी दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुळशीराम माने यांच्या फिर्यादीनुसार माण तालुक्यातील बोडके येथे दुर्गा देवीच्या मंडळाच्यासमोर दि. 23 रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास तुळशीराम गणपत माने वय 60 यांना सुखदेव गणपत माने याने दारु पिवून येवून गाणी म्हणत असताना त्यास येथे गाणी म्हणू नकोस हा बायकाचा कार्यक्रम आहे असे म्हटल्यानंतर तो शिवीगाळ करु लागला. त्यावेळी तुळशीरामचा नातू प्रणव हा तेथे आला. प्रणवने तुम्ही शिव्या देवू नका, असे म्हणाला असता सुखदेवने प्रवणच्या कानाखाली मारली. तसेच झेंड्याची काठी काढून तुळशीरामच्या डाव्या गुडघ्यावर आणि पाठीवर मारुन ढकलून दिले. तुला ठेवतच नाही, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली म्हणून दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पेला आहे. याचा तपास हवालदार व्ही.एच. खाडे हे करत आहेत.
सुखदेव गणपत माने (वय 51) यांच्या फिर्यादीनुसार तुळशीराम गणपत माने हा भाऊ असून तो मला म्हणाला की तु घुमकं वाजवू नको. नाहीतर तुझ्या डोक्यात झांज मारीन, असे म्हणल्यानंतर सुखदेवने घुमकं वाजवायचे बंद केले. त्यानंतर सुखदेव गाण म्हणू लागला. तेव्हा प्रणव रमेश सपकाळ हा गाण्याला आडवे गाणे म्हणू लागला. त्यास सुखदेव म्हणाला नीट गाणे म्हण, त्यावरुन प्रणव रमेश सपकाळ, राणी रमेश सपकाळ, भागिच्या यांनी मारहाण केली. तुळशीराम याने झेंड्याच्या काठीने मारहाण केल्याने मनगठातून हात निखळला आहे.