सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी दि. 21 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून कोडोली येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या अन्न वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येकी 19 टेबल आणि मतमोजणीच्या 16 फेऱ्या होणार आहेत. टपाली मतदानासाठी तीन स्वतंत्र टेबल असून साधारण दीडशे मते पहिल्यांदा मोजली जाणार आहेत. मतमोजणी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार असून पहिल्या 30 मिनिटातच पहिला निकाल जाहीर होणार आहे.
सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठी नऊ नगराध्यक्षपदासाठी तर 169 उमेदवार 25 प्रभागातील 50 नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते .सातारा शहरातील 156 मतदान केंद्रांवर दिनांक दोन दोन डिसेंबर रोजी 86 हजार 140 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला .काही तांत्रिक कारणास्तव मतमोजणीचा निकाल हा 21 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलला गेला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि फलटण नगरपालिका साठी 20 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होत असून दिनांक 21 रोजी नऊ नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीसाठी मतमोजणी होणार आहे.
सातारा पालिकेच्या प्रत्यक्ष मतमोजणीची प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे .प्रांत आशिष बारकुल यांनी याबाबतची माहिती दिली असून मतमोजणीसाठी प्रभागासाठी सोहळा आणि टपाली मतदानासाठी तीन असे 19 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी नेमण्यात आले असून मतमोजणीच्या प्रत्यक्ष दहा फेऱ्या होणार आहेत .सर्वप्रथम तीन स्वतंत्र टेबल टपाली मतदानासाठी असल्याने ती मते ही मोजली जातील. सातारा पालिकेतील पहिल्या प्रभागाचा निकाल यायला 30 मिनिटे लागतील म्हणजे साधारण साडेदहा वाजता पहिला निकाल अधिकृतरित्या जाहीर केल्या जाणार आहे. सर्वप्रथम सर्व ईव्हीएम मशीन आणि त्याची सुरक्षितता ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने तपासली जाणार आहेत सर्व ईव्हीएम मशीन या अन्न वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये ठेवण्यात आले असून तेथे कडक पोलीस बंदोबस्त तीन सत्रांमध्ये मध्ये तैनात करण्यात आला आहे .मतदान केंद्राच्या परिसरामध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून तेथे कोणालाही पूर्वपरवानगीशिवाय प्रवेश दिला जाणार नाही .जिल्हा प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणी त्या त्या पालिका कार्यक्षेत्राच्या संदर्भाने नेमून दिलेल्या बंदोबस्तात आणि उपलब्ध मनुष्यबळावर होणार आहेत .सातारा जिल्ह्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 11 तर 233 जागांसाठी 625 उमेदवार रिंगणात होते. फलटण व महाबळेश्वर नगरपालिकांची मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. 21 रोजी लगेच प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
नगराध्यक्षपदाचा मानकरी कोण ? साताऱ्यात प्रचंड उत्सुकता
सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केले आहेत .जिल्ह्यात भाजपचे चार आमदार आणि एक खासदार असे राजकीय बळ असल्याने भारतीय जनता पार्टीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाचे आहे .आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भाने नगरपालिका निवडणुकांचे निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत .साताऱ्यात महाविकास आघाडीच्या वतीने सुवर्णाताई पाटील व भारतीय जनता पार्टीचे साताऱ्यातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्यात राजकीय चुरस रंगली होती त्यामुळे अंतिम बाजी कोण मारणार याची उत्सुकता ताणली गेली आहे .याशिवाय अपक्ष उमेदवार शरद काटकर अभिजीत बिचुकले सुधीर विसापुरे या अपक्ष उमेदवारांनी सुद्धा जोरदार प्रचार केल्याने मत विभागणीचा फटका कोणाला बसणार हे पाहणे महत्त्वाचे आहे .सातारा नगरपालिकेतील नगरसेवक पदासाठी 169 उमेदवार रिंगणात होते .दोन्ही नेत्यांच्या बंडखोर 45 उमेदवारांनी मनोमिलनाच्या उमेदवारांना आव्हान निर्माण केले .त्यामुळे हे अपक्ष उमेदवार प्रस्थापितांना किती फटका देणार याच्या सुधा राजकीय पैजा शहरात लागल्या आहेत .महाविकास आघाडी साताऱ्यात महायुतीच्या उमेदवाराला किती टक्कर देऊ शकेल या निमित्ताने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली आहे .