सातार्‍यात नगराध्यपदासाठी 21 जण इच्छुकांचे अर्ज; 368 इच्छुकांची यादी भाजप प्रदेश कार्यालयाकडे रवाना

by Team Satara Today | published on : 11 November 2025


सातारा : सातारा पालिकेच्या 25 प्रभागांमध्ये निवडणूक लढवू इच्छिणार्‍या 368 उमेदवारांचे अर्ज भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवण्यात आले आहे. नगराध्यक्षपदासाठी 21 इच्छुकांनी मुलाखती दिल्या असून, पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपचे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. राज्यातील 242 नगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत सातारा जिल्ह्यातील पालिकांच्या 222 जागांसाठी इच्छुकांचे अर्ज असलेला लिफाफा प्रदेशाध्यक्षांना सादर करण्यात आला.

सातारा पालिकेत नगरसेवकपदासाठी 368 आणि नगराध्यक्षपदासाठी 21 इच्छुकांनी सोमवारी मुलाखती दिल्या. शहरातील प्रभाग 6 मध्ये सर्वाधिक 27 आणि त्या खालोखाल प्रभाग 15 मध्ये 23 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. प्रभाग 11 व 16 या दोन ठिकाणी मिळून 23 जणांनी मुलाखती दिल्या. मंत्री शिवेंद्रसिंहराजे सातार्‍यात परत आल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी केली जाणार आहे. नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार निवडले जाणार आहेत. त्यातून नगराध्यक्षपदाच्या अंतिम उमेदवाराबाबत खासदार उदयनराजे भोसले व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे निर्णय घेणार आहेत.

पालिका निवडणूक भाजपच्या कमळ या चिन्हावर लढवली जाणार असून, नव्या दमाचे चेहरे, प्रभागासाठी निधी खेचून आणण्याची धमक आणि इलेक्टिव्ह मेरिट या निकषांवर उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. यासंदर्भात उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस चर्चा करणार असल्याची माहिती आहे. सातारा जिल्ह्यात सातारा पालिका भाजपसाठी महत्त्वाची असल्याने, येथे कोणताही दगाफटका होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात आहे.

बंडखोरीचा वणवा रोखणार कसा?

प्रभाग 7, 11, 16, 14, 21, 24 यामध्ये तगड्या उमेदवारांच्या अस्तित्वामुळे लढती रंगतदार होणार आहेत. मनोमीलनात एक उमेदवार अंतिम झाल्यावर दुसर्‍याला थांबावे लागणार आहे. त्यामुळे इतर इच्छुकांना दुसर्‍या आघाडीची वाट चोखाळावी लागणार आहे अथवा अपक्ष उमेदवारी करावी लागार आहे. बर्‍याच प्रभागांमध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे दोन्ही नेत्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक प्रभागात दहापेक्षा अधिक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून, बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. ही बंडखोरी दोन्ही नेते कशी थोपवणार, याचे औत्सुक्य आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार ; आमदार शशिकांत शिंदे यांची माहिती
पुढील बातमी
कापडगाव हद्दीत अपघातात आयशर-मोटारसायकल धडकेत युवक ठार; दोघे गंभीर जखमी

संबंधित बातम्या