सातारा : कास-बामणोली मार्गावरील फळणी गावच्या हद्दीत रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. तेटलीहून साताऱ्याकडे निघालेल्या एसटी बसला (क्र. MH 14 KQ 1394) एका भरलेल्या डंपरने (क्र. MH 11 BK 1888) धोकादायक वळणावर समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात एसटीतील ३२ पैकी २० प्रवासी गंभीर जखमी झाले असून, ही बस थोडक्यात दरीत कोसळता-कोसळता वाचली. अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
हा अपघात अंधारी-कास दरम्यान, जंगलातील वाघाच्या पाणवठ्या जवळच्या 'एस' आकाराच्या धोकादायक वळणावर झाला. सातारा डेपोची ही बस तेटलीहून साताऱ्याकडे परतीच्या प्रवासाला निघाली होती. याचवेळी साताऱ्याहून बामनोलीकडे भरून आलेला डंपर वेगात वळणावर आला आणि त्याने एसटी बसला थेट धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की, एसटी बस ७० ते ८० फूट मागे ढकलली गेली. बस आणखी काही फूट मागे गेली असती, तर ती खोल दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती. जखमी झालेल्या २० प्रवाशांना हात मोडणे, डोक्याला मार लागणे, ओठ फाटणे अशा स्वरूपाच्या गंभीर जखमा झाल्या असून, बसमध्ये सर्वत्र रक्त सांडले होते. अपघातात डंपरचा क्लिनरही जखमी झाला आहे.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र बामनोली, सातारा येथील सर्वसाधारण रुग्णालय आणि काही खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मेढा पोलीस स्टेशनचे हवालदार उदागे, बी. आर. नष्ठे आणि कॉन्स्टेबल गुरव यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
डंपरची मुजोरी' ठरतेय अपघातांना आमंत्रण
सातारा-बामणोली तसेच मेढा-अंधारी या मार्गांवर धनदांडग्या ठेकेदारांचे डंपर अत्यंत सुसाट वेगाने धावत असल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून सिद्ध झाले आहे. सामान्य जनतेच्या जीवाचा विचार न करता ही वाहने बेदरकारपणे चालवली जात असल्याने या मार्गांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. डंपर चालकांच्या या मुजोरीवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.