वाघेरात १०५ गाव समाज संघटनेचा रास्ता रोको

अधिकाऱ्यांसमोर निकृष्ट कामाचा वाचला पाढा

by Team Satara Today | published on : 11 August 2025


सातारा  : कांदाटी, सोळशी, कोयना व तापोळा विभागांतील झालेली विकासकामे रस्ते, पूल मोऱ्या ही निकृष्ट दर्जाची झाली असून, त्यांची चौकशी करून अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कारवाई करावी. महावितरण व दूरसंचार विभागाने कारभार सुधारावा आदी मागण्यासाठी १०५ गाव समाज संघटनेच्या वतीने आज वाघेरा येथे रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान आंदोलकांनी विभागातील निकृष्ट कामांचा अधिकाऱ्यांसमोर पाढा वाचला.

१०५ गाव समाज संघटनेचे अध्यक्ष धोंडीबा धनावडे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबूराव संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली कांदाटी, कोयना, सोळशी व तापोळा विभागांतील शेकडो ग्रामस्थ आज सकाळी वाघेरा (ता. महाबळेश्वर) येथे जमा झाले. त्यांनी महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर ठिय्या मांडला. यावेळी आपल्या मागण्यासाठी घोषणाबाजी केली. सुमारे दोन तास आंदोलकांनी रस्ता अडवून ठेवल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरिक व पर्यटकांची मोठी गैरसोय झाली.

या वेळी संतोष जाधव, राजू घाडगे, भाऊ मोरे, रवी संकपाळ, दिनेश मोरे, प्रकाश जाधव, हरिभाऊ संकपाळ, आनंद कदम, मधुकर मोरे, प्रकाश सपकाळ यांनी निकृष्ट कामांच्या बाबतीत अधिकाऱ्यांच्या समोर पाढाच वाचला. यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र भुतकर, दूरसंचार विभागाचे मंडल अधिकारी योगेश भागवत आदींनी आंदोलकांच्या मागण्यांवर सकारत्मकता दाखविल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलन स्थळी पोलिस उपनिरीक्षक रौफ इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी आनंद मुरडे, कोंडिबा कदम, श्रीरंग निपाणे, प्रकाश जाधव, अंकुश मालुसरे, संजय मालुसरे, विठ्ठल कदम, भिकू कारंडे, गणपत कारंडे, दिनेश मोरे, सुरेश पाटील, सुनील शेलार, भगवान भोसले, ताताराम पाटील, नारायण कदम, प्रमोद मोरे, राजाराम कदम, नामदेव सावंत, तानाजी शेलार, अभिषेक शिंदे, विठ्ठल जाधव, पांडुरंग जाधव, लक्ष्मण शिंदे, हरिभाऊ सकपाळ, गोविंद सकपाळ, राजाराम मोरे, रवींद्र संकपाळ, सखाराम शेलार, सुनील नलावडे, रामचंद्र शिंदे, बाजीराव सकपाळ आदी मान्यवरांसह ३६ गाव समाज,४३ गाव समाजाचे पदाधिकारी व ग्रामस्थ सरपंच उपस्थित होते.

या विभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी येत आहे. मात्र विकास होत नाही. फक्त ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचाच विकास होत आहे. भरमसाट टक्केवारी घेऊन अधिकारी ठेकेदारांची बाजू घेत आहेत. महावितरण आणि दूरसंचार विभागाची कायमच बोंब आहे. १५-२० दिवस वीज गायब असते.

- धोंडीबा धनावडे, अध्यक्ष, १०५ गाव समाज संघटना

कोयना धरणाला ६० वर्षे झाली, तरी पुनर्वसनाची कामे पूर्ण झाली नाहीत. बैठकांमध्ये मंत्र्यांच्या समोर अधिकारी सकारात्मकता दाखवतात; पण अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे विभागातील लोकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

- बाबूराव संकपाळ, माजी सदस्य, जिल्हा परिषद



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलांचे दागिने पळविणारा पोलिसांनी ताब्यात
पुढील बातमी
सातत्याने गुंगारा देणारा संशयित जेरबंद

संबंधित बातम्या