महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी जिल्ह्यात काँग्रेस आक्रमक; जिल्हा कार्यकारिणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 12 January 2026


सातारा  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) रद्द करून नवीन VB-Gram-G अधिनियम अमलात आणण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करत, या निर्णयाचा देशातील तमाम जनतेच्या वतीने अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जाहीर निषेध केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली.

सन २००५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने देशातील गोरगरीब जनतेला केंद्रस्थानी ठेवून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) लागू केली होती. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला रोजगाराची हमी देण्यात आली होती. रोजगाराची मागणी केल्यानंतर १५ दिवसांच्या आत काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य शासनावर सोपविण्यात आली होती. कोणतीही व्यक्ती उपाशी किंवा बेरोजगार राहू नये, यासाठी ही योजना राबविण्यात येत होती. मनरेगा योजनेच्या माध्यमातून दरवर्षी देशभरातील सुमारे ५ ते ७ कोटी कुटुंबांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यात येत होता.

मात्र सध्याच्या भाजपप्रणित केंद्र सरकारने मनरेगा रद्द करून VB-Gram-G अधिनियम लागू करण्याचे ठरविले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या नव्या कायद्यामुळे देशभरातील गोरगरीब जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या अधिनियमान्वये राज्य शासनाचे अधिकार कमी करण्यात येऊन सर्व अधिकार केंद्र सरकारकडे केंद्रीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे काम करण्याचा आणि काम मागण्याचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला जाणार असून ग्रामपंचायती ठेकेदारांच्या मर्जीवर अवलंबून राहतील, असा दावा करण्यात आला आहे. परिणामी गोरगरीब जनतेचा रोजगार धोक्यात येईल, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची उघडपणे पायमल्ली होऊन सर्वसामान्य जनतेच्या हक्कांवर गदा येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार 

या निर्णयाच्या निषेधार्थ देशभरातील जनतेला सोबत घेऊन अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विजयराव कणसे, रजनी कदम, सुषमा घोरपडे, झाकीर पठाण, बाबासाहेब कदम, महेंद्र बेडके, नजीम इनामदार, अमरजीत कांबळे, प्रा. सदाशिव खाडे, प्रताप देशमुख, कल्याण पिसाळ, अजित कदम, सादिक बागवान, आनंदराव नागरे, डॉ. संतोष कदम, अमर करंजे, सादिक बागवान, जगन्नाथ कुंभार, शंकर पवार, दत्तात्रय धनवडे, अमोल शिंदे, पार्थ गायकवाड, आनंदराव जाधव, राजेंद्र भंडारी, पंकज पवार आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
किल्ले अजिंक्यताऱ्यावर रंगला शाही स्वाभिमान दिन; जिल्हाधिकारी संतोष पाटील झाले छ. शाहु महाराजांच्या पालखीचे भोई
पुढील बातमी
साताऱ्यात व्हाट्सऍप ग्रुपमधील ६ जणांकडून वृद्धाची ६१ लाख २५ हजारांची फसवणूक

संबंधित बातम्या