सातारा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियम (मनरेगा) वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष देशव्यापी आंदोलन छेडणार आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज रविवार, दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले की, येत्या ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ ही मोहीम देशभर राबवली जाणार असून, केंद्र सरकारच्या मनरेगाविरोधी निर्णयांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. मनरेगा ही केवळ एक सरकारी योजना नसून भारतीय संविधानाने दिलेला कामाचा मूलभूत अधिकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील मजूर, शेतकरी व गरिबांच्या रोजगार, मजुरी, सन्मान तसेच वेळेवर निधी मिळण्याच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी जिल्हा काँग्रेस एकजुटीने संघर्ष करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, दुपारी एक वाजता बसस्थानकातून पोवई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारविरोधात जोरदार निषेध व्यक्त केला. मनरेगाशी संबंधित प्रश्नांवर तोडगा न निघाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी विजयराव कणसे, राजेंद्र शेलार, बाबासाहेब कदम, रजनी पवार, झाकीर पठाण, भानुदास माळी, अमरजीत कांबळे, सुषमा राजे घोरपडे, प्रताप देशमुख, नजीम इनामदार, विलास पिसाळ, कल्याण पिसाळ, ॲड श्रीकांत चव्हाण, निवास थोरात, प्रा सदाशिव खाडे,महेश साळुंखे, शंकर पवार,अन्वर खान, डॉ. संतोष कदम,नरेंद्र पाटणकर,महेंद्र सूर्यवंशी,पंकज पवार, आनंदराव जाधव अमर करंजे आदी उपस्थित होते