मुंबई : विधानसभा निवडणुकी आगोदर मोठा गाजावाजा करत सुरु केलीली योजना म्हणजेच लाडकी बहिण योजना, पण आता लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये देण्यासाठी महायुती सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. दिवाळीआधी सप्टेंबरच्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा करून दिलासा दिला होता. त्याचवेळी ऑक्टोबरचा हप्ता दिवाळीच्या दिवशी किंवा भाऊबीजेच्या दिवशी तरी मिळेल, अशी लाडक्या बहिणींना आशा होती. तीही आता मावळली आहे. ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न आता पडला असून, दिवाळी झाली आणि भाऊबीजेला ही लाडक्या बहिणींना सरकारने साधी ओवाळणी दिली नाही त्यामुळे लाडक्या महायुती सरकारच्या लाडक्या बहिणी मात्र नाराज झाल्या असून पुढचा हप्ता कधी याबबत नवीन अपडेट समोर आली आहे.
महाराष्ट्रातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आणि दिवाळी गोड झाली. आता ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार, याकडं बहिणींचं लक्ष लागलं आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. मीडिया वृत्तानुसार, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भाऊबीजेला मिळणार होता, पण भाऊबीजेच्या दिवशीही लाडक्या बहिणींना गोड भेट मिळाली नाही. आता ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत हप्त्याचे १५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता ईकेवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकाही केली होती. दुसरीकडं ईकेवायसी केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही का, असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडला आहे. मात्र, लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे सरकारने त्यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. त्यामुळे ईकेवायसी केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही या चर्चेत काहीही तथ्य नाही. ईकेवायसी केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता रोखण्यात येईल, असं सरकारनेही अधिकृतरित्या कुठेही सांगितलेले नाही. त्यामुळे अशा चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही.