सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रेकॉर्ड विभागात सक्रिय असणारे कर्मचारी संतोष नलावडे नांदेड येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांचा सातार्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे महसूल कर्मचार्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे.
दूरचित्रवाणी वरील विविध मालिकांमुळे संतोष नलावडे यांनी अभिनेता म्हणून चांगला ठसा उमटविला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत येणार्या रेकॉर्ड रूमला त्यांची सेवा होती. तब्बल 14 वर्ष त्यांनी ही सेवा अत्यंत प्रामाणिकपणे बजावली. महसूल कर्मचार्यांच्या विभागीय स्पर्धांकरिता ते नांदेड येथे गेले होते. स्पर्धा संपल्यानंतर तेथून मुक्कामी परतत असताना त्यांच्या दुचाकीला वाहनाने धडक दिल्यामुळे ते अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना सातार्यात कर्मचार्यांनी अधिक उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी नलावडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. संतोष नलावडे यांनी आपल्या हरहुन्नरी स्वभावामुळे कर्मचार्यांमध्ये विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.