सातारा : महायुतीचे सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातार्यात सोमवारी विराट शक्ती प्रदर्शन करत दुपारी दोन वाजता आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी खासदार उदयराजे भोसले तसेच बाबाराजे समर्थकांसह निवडक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आरंभ ही प्रचंड है, बाबाराजे तुम आगे बढो अशा घोषणाबाजींनी राजवाडा परिसर दणाणला. सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील बाबाराजे यांचे हजारो कार्यकर्ते सातार्यात जमा झाल्याने सातार्याला जत्रेचे स्वरूप आले होते.
सकाळी आठ वाजता आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावर जाऊन कुलदैवत तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यानंतर स्वर्गीय अभयसिंहराजे उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पुन्हा सुरुची येथे निवासस्थानी येऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. तोपर्यंत सातारा-जावली कार्यक्षेत्रातील हजारो कार्यकर्ते सुरुचीच्या बाहेर जमू लागले होते. सकाळी सव्वा 11 वाजता वाजत गाजत मिरवणूक निघाली. ढोल ताशांच्या गजरामध्ये बाबाराजे आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह राजवाडा येथे पोहोचले. यावेळी राजू भैय्या भोसले, अविनाश कदम, निशांत पाटील, रवींद्र ढोणे, जयेंद्रदादा चव्हाण असे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. बाबाराजे गांधी मैदानावर येताच ढोल ताशांचा गजर सुरू झाला. शिवेंद्रसिंहराजे फुलाने सजवलेल्या एका ओपन ट्रकमध्ये स्वार झाले. यानंतर मिरवणूक गांधी मैदानावरून मोती चौक, तेथून पंचमुखी गणेश मंदीर मार्गे पोलीस मुख्यालयावरून पोवई नाका येथे पोहोचली.
तुमचे प्रेम आणि तुमचा विश्वास हीच माझी खरी ताकत आहे. सातारा आणि जावळी तालुक्याच्या विकासासाठी मी कायम वचनबद्ध आहे. गेल्या पाच वर्षात विकास कामे केल्यामुळेच विरोधकांना स्वतंत्र बोलायची आता जागाच नाही. यापुढेही आपले आशीर्वाद कायम सतत पाठीशी असू दे, असे भावनिक आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी करताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बाबाराजे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, या घोषणांनी पोवई नाका दणाणला. तोपर्यंत कराड उत्तर च्या मोहिमेवर गेलेले खासदार उदयनराजे भोसले तात्काळ पोवई नाका येथे पोहोचले. दोन्ही राजे पोवई नाक्यावर एकत्र येताच पुन्हा ढोल ताशांचा जोरात गजर सुरू झाला. दोन्ही राजेंनी पोवई नाका येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व तेथून शिवेंद्रसिंहराजे व खासदार उदयनराजे भोसले एकाच वाहनातून प्रांत कार्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आपल्या निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सातार्यात या जोरदार शक्ती प्रदर्शनाची चांगलीच चर्चा झाली. धडाकेबाज शक्ती प्रदर्शनाच्या मिरवणुकीमुळे सातार्याचे राजकारण चांगले ढवळून निघाले आहे.