कास पठारावर बहरले फुलांचे गालिचे

लाल, गुलाबी, पांढऱ्या, निळ्या रंगांची आकर्षक उधळण

by Team Satara Today | published on : 20 September 2024


सातारा : जागतिक वारसास्थळ कास पठारावरपर्यटनासाठी राज्यासह देश-विदेशातून बहुसंख्य पर्यटक भेट देत असून, राजमार्गावरील कुमुदिनीची पांढरी शुभ्र कमळाची फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत. आतापर्यंत हजारो पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली असून, शनिवार, रविवारी शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारोंच्या संख्येने पर्यटक कासच्या फुलोत्सवचा आनंद लुटत आहेत.

विविधरंगी फुलांचे गालिचे, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पुष्प पठारावर कुटुंबासमवेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दरम्यान, कास-महाबळेश्वर राजमार्गावरील तीन किलोमीटर अंतरावरील पांढऱ्या शुभ्र कुमुदिनी फुलांचे पर्यटकांना आकर्षण होऊ लागल्याने पायी चालत या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक फुलांची पर्वणी अनुभवताना दिसत आहेत.

पठारावर सतत पर्यटकांची रेलचेल सुरू असून, ठिकठिकाणी गाइड पर्यटकांना येथील दुर्मीळ फुलांचे व वनस्पतींसंदर्भात पर्यटकांना मार्गदर्शन करीत आहेत. पठारावरील जैवविविधता पाहता कास पठाराची ख्याती जगभर पसरली आहे. जिल्ह्याला लाभलेले कास पठार निसर्गाचे वरदान आहे. कित्येक पर्यटक येथील फुलांसमवेत आपल्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात, यासाठी येथील मनाला मोहिनी घालणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत.

कास पठारावर परदेशी पाहुणेदेखील येथील फुलांचा नजराणा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. परदेशी पर्यटकांनी पठाराला भेट देऊन येथील दुर्मीळ फुलांचे कौतुक केले आहे. तसेच तीन किलोमीटर अंतर पायी चालत देश - विदेशातील बहुसंख्य पर्यटकांची पावले राजमार्गावरील कुमुदिनी तलावाकडे वळत आहेत.

कास पुष्प पठारावरील साडेतीनशेच्या आसपास दुर्मीळ प्रजाती वर्षभर येतात. अनेकविध प्रकारच्या प्रजातींचे फ्लॉवरिंग सुरू असून, चांगले फ्लॉवरिंग आहे. सध्या फ्लॉवरिंगसाठी वातावरणही पोषक आहे. -सोमनाथ जाधव, सदस्य, कास पठार कार्यकारी समिती


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडले  : काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
पुढील बातमी
बॉलिवूड स्टार रणवीर सिंग ‘डॉन 3’च्या शूटिंगसाठी सज्ज

संबंधित बातम्या