मिरजहून फलटणकडे जनावरांचे मांस घेऊन जाणारा ट्रॅक ताब्यात ; आर्थिक फायदा करणारे मोठे रॅकेट असल्याची शंका

by Team Satara Today | published on : 23 December 2025


पुसेगाव  :  मिरजहून फलटणकडे जनावरांचे सुमारे ४९०८ किलो मांस व अन्य अवयव घेऊन जाणारा आयशर ट्रॅक पुसेगाव पोलिसांनी पकडला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांनी दिली.

अवधूत गोरख धुमाळ, (रा. तरडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. २१ रोजी रात्री दीडच्या सुमारास डिस्कळ येथील पेट्रोल पंपाजवळील रस्त्याने लाल रंगाच्या आयशर ट्रॅक नंबर (एम एच ०३ डी व्ही ६५७८) मधून जनावरांचे मांस आणि शिंगे, पाय, नख्या, मुंडके व चरबी नेली जात असल्याचे जाणवल्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण व कर्मचारी यांनी तातडीने जाऊन ट्रॅकचालक वसील वासिम शेख (सध्या रा. दिनदांडू नगर, वडाळा, मुंबई  मूळ गाव मिरजपू, जि. प्रतापगड उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले. गाडी मध्ये सुमारे ४९०८ किलो वजनाचे जनावरांचे मांस, शिंगे, छाटलेली मुंडकी, पाय व चरबी आढळली. विना परवाना वाहतूक केल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक फौजदार डी डी बर्गे करत आहेत.

फलटण, बारामती येथील काही ठिकाणी जनावरांचे मांस व चरबीपासून बनावट मैदा आणि तूप तयार केले जात असल्याचे बोलले जात आहे. तर जनावरांच्या पायाच्या नख्या आणि शिंगे यापासून  पावडर बनविण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणावर म्हशी, गायी अशा जनावरांची हत्या करून आर्थिक फायदा करणारे मोठे रॅकेट असल्याची शंका उपस्थित होत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे निकाल जाहीर
पुढील बातमी
सारंगखेड्यातील प्रसिद्ध नृत्य करणारा घोडा ‘राजू ३’ करंजेत दाखल; गणेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक

संबंधित बातम्या