सातारा : ऐतिहासिक सातारा नगरीत आज साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. 'स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी' (शाहू क्रीडा संकुल) येथे ध्वजारोहणाच्या मंगल सोहळ्याने या साहित्यकुंभाचा दिमाखदार शुभारंभ झाला. सातारा जिल्ह्याचे वैभव आणि साहित्याची परंपरा यांचा अनोखा संगम आज या ठिकाणी पाहायला मिळाला.
महाराष्ट्र साहित्य परिषदे, पुणे, शाखा-शाहूपुरी (सातार) आणि मावळा फौंडेशन, सातारा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे 1 ते 4 जानेवारील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे सातारा येथे आयोजन करण्यात आले आहे.
मान्यवरांची मांदियाळी आणि ध्वजारोहण
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या ऐतिहासिक प्रसंगी ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाहक सुनीताराजे पवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, ज्येष्ठ उद्योजक भालचंद्र जोशी, संदीप शहा, रवींद्र बेडकीहाळ यांसह अनेक साहित्यिक, मान्यवर, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध 'कट्ट्यांचा' उत्साह
संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. हजारो पुस्तकांनी सजलेली ही ग्रंथनगरी वाचकांसाठी ज्ञानाचा खजिना ठरत आहे. साहित्याच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या विविध कट्ट्यांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले:
कवी कट्टयाचे उद्योजक भालचंद्र जोशी यांच्या हस्ते व रवींद्र बेडकीहाळ यांच्या उपस्थितीत तर गझल कट्टयाचे उद्घाटन समंलनाचे स्वागत अध्यक्ष श्री. भोसले यांच्या हस्ते झाले. प्रकाशन कट्टयाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले.