कराड : हद्दपरीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. शहरातील बुधवार पेठेत असलेल्या प्रभात टॉकीजसमोर मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
श्रीधर उर्फ भैय्या काशिनाथ थोरवडे (वय 25, रा. बुधवार पेठ, कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बुधवार पेठेत राहणार्या श्रीधर उर्फ भैया थोरवडे याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला सातारा तसेच सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून संशयित थोरवडे हा शहरातील प्रभात टॉकीज परिसरात आला असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांना मिळाली. त्यांनी उपअधीक्षक कार्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, हवालदार प्रवीण पवार, सागर बर्गे, मयूर देशमुख यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस पथकाने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील प्रभात टॉकीज परिसरात छापा टाकला असता संशयित श्रीधर उर्फ भैय्या थोरवडे त्याठिकाणी आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केले आहे. त्याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.