कोरेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी आलेल्या कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची मंगळवारी दुपारी एक वाजता भेट घेऊन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या कारभाराविषयी तक्रारींचा पाढा वाचत सविस्तर निवेदन सादर केले.
आमदार शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव, पक्षाचे युवा नेते साहिलबाबा शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी उपस्थित होत्या.
निवेदनात कोरेगाव तालुक्यात जनतेला अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी काही गुन्हेगारांना खतपाणी घातल्याने तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात आला. कोरेगाव शहरात अवैध धंदे सुरू असूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे, तसेच ड्राय डे दिवशीही अवैध व्यवसायांना पाठीशी घातले जात असल्याचे आरोप निवेदनात नमूद करण्यात आले आहेत.
पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, अदखलपात्र तक्रारींवरून विनाकारण त्रास देणे, पोलीस ठाण्यात रात्रभर थांबवून ठेवणे, राजकीय दबावाखाली एकतर्फी कारवाई करणे, निरपराध कार्यकर्त्यांवर पुराव्याशिवाय गुन्हे दाखल करणे, दबाव व धमक्या देणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर स्वरूपाच्या अजामीनपात्र गुन्ह्यातील आरोपींना अटक न करणे व तपासात जाणूनबुजून दिरंगाई केल्याचा आरोपही करण्यात आला.
या संदर्भात यापूर्वीही आंदोलने झाली असून दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या तोंडी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. तसेच पोलीस अधीक्षक तुषार दोशी व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांना निवेदने देण्यात आली होती. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली दिसत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर निवेदनाची दखल घेऊन कोरेगाव तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी साहिलबाबा शशिकांत शिंदे यांच्यासह तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती ॲड. पांडुरंग तथा पी.सी. भोसले, जयवंतदादा घोरपडे, किशोर नानासाहेब बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे, संचालक ॲड. अमोल राशिनकर, समीर वीर, किरण रणखांबे, सचिन यादव, पंचायत समिती सदस्य केतन चव्हाण, निलेश जगदाळे, रूपाली गुरव, शिवाजी गुरव, नगरसेवक हेमंत बर्गे, नामदेव उर्फ प्रशांत गुरव आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.
विशेष पोलीस महानिरीक्षकांनी निवेदनाची दखल घेऊन योग्य ती चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे