आपण काय खातो याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. पण सध्या प्रत्येकाच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बरेचदा पदार्थ हेल्दी असतात, पण त्यात वापरण्यात येणारे तेल हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. भारतीय स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यासाठी मोहरी, तीळ, नारळ, सूर्यफुलाच्या तेलाचा वापर होतो. पण आरोग्यासाठी कोणते तेल योग्य? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल.
आयुर्वेदानुसार, काही विशिष्ट तेल आहेत जी स्वयंपाक करण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. पण चुकीच्या तेलाच्या सेवनामुळे बीपी, लठ्ठपणा, ब्लड शुगर यासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.
आरोग्यासाठी कोणते तेल योग्य? याची माहिती आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर रेखा राधामोनी यांनी दिली आहे...
तिळाचे तेल...
तिळाच्या तेलामध्ये संतुलित फॅटी ऍसिड तसेच अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि फायटो-इस्ट्रोजेन्स असतात. यासह यात ओमेगा-६ फॅटी ऍसिडस, जीवनसत्त्वे आणि फायबर आढळते. शरीराच्या आरोग्यासाठी चालना द्यायला तिळाचे तेल फायदेशीर ठरते. बरेच जण तिळाच्या तेलाचा वापर फक्त खास पाककृती तयार करण्यासाठी करतात. पण याचा वापर आपण रोजच्या स्वयंपाकात करू शकतो.
मोहरीचे तेल...
मोहरीच्या तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यासह त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर ठरते. शिवाय यात बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे जसे की रिबोफ्लेविन आणि नियासिन असतात. जे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात. या तेलात शिजवलेले अन्न पचण्यास सोपे असते आणि ते मेटाबॉलिज्म रेट वाढवण्यास मदत करते.
खोबरेल तेल...
खोबरेल तेलामध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक संतृप्त चरबी असते. या तेलात अनेक उत्तम गुणधर्म आढळतात. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. जर आपण व्यायाम करत असाल आणि लवकर थकत असाल तर आहारात खोबरेल तेलाचा वापर करा. शिवाय वेट लॉसदरम्यान, नियमित आपल्या आहारात १ ते २ चमचे खोबरेल तेलाचा वापर करा.
सूर्यफुल तेल...
भारतातील बहुतांश घरात सूर्यफुलाच्या तेलाचा वापर करण्यात येतो. सूर्यफूल तेलामध्ये व्हिटॅमिन ई, बी१, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे, जस्त, लोह, कॅल्शियम, मॅंगनीज आणि फोलेट यांसारखे विविध पोषक घटक असतात. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. आपण याचा वापर कमी प्रमाणात आहारात करू शकता.
शेंगदाणा तेल...
शेंगदाणा तेलामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, व्हिटॅमिन ई, बी६, कॅल्शियम आणि जस्त आढळते. शिवाय त्यात मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे हृदयविकारांपासून रक्षण करते. पण याचा अतिप्रमाणात वापर करणे टाळावे. जर आपण विशिष्ट आजाराने ग्रास्ले असाल तर, तेलाची निवड करताना डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.